Akole Free Textbooks Pudhari
अहिल्यानगर

Akole Free Textbooks: दोन महिने उलटले, विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा शिक्षक भारती तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

अकोले: अकोले तालुक्यात शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अनेक जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शासनाची मोफत पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्याचा आरोप शिक्षक भारती संघटनेने केला आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा शिक्षक भारती तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

शिक्षक भारतीचे पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांनी शिक्षणमंत्री, अपर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आणि जि. प. चे शिक्षणाधिकारी यांना सविस्तर निवेदन पाठवून शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

संघटनेने पंचायत समिती अकोले येथील शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. पाठ्यपुस्तक वितरणाबाबत वारंवार विचारणा करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा निवेदनात केला आहे. तसेच शिक्षक, पालक आणि संघटनांकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.

शिक्षक भारतीने उपस्थित केलेला सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे अकोले तालुक्याला गेल्या अनेक वर्षांपासून नियमित पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारीच मिळालेला नाही. प्रभारी व्यवस्थेवरच संपूर्ण कारभार चालत असल्याने शैक्षणिक नियोजन, पाठ्यपुस्तक वितरण, शिक्षकांच्या सेवा विषयक प्रश्नांचे निराकरण आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यावर परिणाम होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

संघटनेने शासनाला स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे की, अकोले तालुक्यास तात्काळ कायमस्वरूपी पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नियुक्त करावा. सक्षम अधिकारी उपलब्ध झाल्यास अशा प्रकारच्या समस्या भविष्यात टाळता येतील आणि प्रशासन अधिक जबाबदार होईल, असे संघटनेचे मत आहे.

निवेदनावर तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही दिला आहे.  या मागणीस सचिव सुनील गाडगे, विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, महिला अध्यक्ष रूपाली बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे, दीपक फापाळे, समन्वयक शरद पवार, विजय पांडे, अमोल तळेकर, संतोष नवले.

प्रवीण मालुंजकर, साई थोरात, संपत वाळके, प्रवीण काळे, सहसचिव राहुल कानवडे, तालुकाध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, अतुल कोताडे, दिगंबर देसाई, महेंद्र काळंगे, सचिव वंदना जाधव, कल्पना चौधरी, मफीज इनामदार, गणपत धुमाळ, बाबासाहेब तांबे, अकील फकीर, बाबाजी लाळगे, वैभव चोथे, श्याम जगताप, आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

निवेदनात पाठ्यपुस्तक वितरणातील विलंबाची विभागीय चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशी, जबाबदारी निश्चित करणे, तसेच लागू नियमांनुसार आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT