12 हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड जुळेना pudhari
अहिल्यानगर

Students Aadhaar Mismatch: दररोज शाळेत येतात तरीही विद्यार्थी ‘बोगस’ कसे? तब्बल 12 हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड जुळेना

पटावरील विद्यार्थ्यांऐवजी आधारकार्ड पडताळणी झालेले विद्यार्थीच गाह्य धरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे

पुढारी वृत्तसेवा

नगर: विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पटसंख्येनुसार.., पोषण आहार वाटप पटसंख्येनुसार.., मोफत पुस्तके वाटप ते देखील पटसंख्येनुसार, मग असे असताना शिक्षकांची संच मान्यता करताना मात्र पटावरील विद्यार्थ्यांऐवजी आधारकार्ड पडताळणी झालेले विद्यार्थीच गाह्य धरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यासाठी दि. 30 सप्टेंबरची शेवटची मुदत आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 12 हजार विद्यार्थी शाळेत येतात, मात्र त्यांच्या आधार कार्डची अडचण असल्याने त्याचा तब्बल 350 पेक्षा अधिक शिक्षकांना फटका बसण्याची शक्यता आहे. आपण अतिरिक्त ठरण्याच्या भितीने शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. (Latest Ahilyanagar News)

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता ही दि. 30 सप्टेंबर 2025 अखेरची पटावरील नोंद झालेल्या पैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहे. यापुर्वीच शिक्षण संचालक महेश पालकर तसेच शरद गोसावी यांनी तसे पत्र काढलेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांची आपल्या पटावरील विद्यार्थ्यांची आधार पडताळणीसाठी धावपळ सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात 3534 शाळा असून, यामध्ये 186272 विद्यार्थी आहेत. यापैकी 173996 आधार पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे एवढेच विद्यार्थी अधिकृत दिसत आहेत.तर 7745 विद्यार्थ्यांकडे आधारकार्डच नाहीत.

4112 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करणे बाकी आहे. तर 149 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पडताळणी सिस्टिमवर होत नसल्याचे चित्र आहे. अशाप्रकारे सुमारे 12 हजार विद्यार्थी शाळेत येतात, मात्र आधारकार्ड सक्तीच्या निर्णयाने ते जणू अनाधिकृत असल्याचे यातून दिसते आहे.

..तर 350 शिक्षक अतिरीक्त ठरणार!

शासनाने आधार सक्तीचा निर्णय घेतला, मात्र त्यातील अडचणीही लक्षात घेण्याची गरज आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी पटावर असतानाही शिक्षक अतिरीक्त होणार आहेत. सरासरी 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक धरला तरी 12 हजार शिक्षकांमागे 350 पेक्षा अधिक शिक्षक अतिरीक्त ठरू शकतात, या शिक्षकांचे करायचे काय, त्यांना कोठे नियुक्त्या द्यायच्या, तेवढ्या रिक्त जागा आहेत का? असे अनेक प्रश्न शिक्षकांना भेडसावताना दिसत आहेत.

सारांश...

एकूण शाळा : 3534

एकूण विद्यार्थी : 186272

‘आधार’ पडताळणी पूर्ण : 173996

‘आधार’ नसलेले : 7745

आधार अपडेट नाहीत : 4112

सिस्टिमला प्रलंबित : 419

आधार एम बी यु करत असताना शाळास्तरावर अनंत अडचणी येत आहेत. किमान जिल्ह्यातील प्रत्येक केंद्र शाळेवर आधार कीट पुरवावी. जेणेकरून आधार अभावी शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत. आधार ऐवजी प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या गृहीत धरून संचमान्यता व्हावी. -
भास्कर नरसाळे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शिक्षक संघ,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT