खेड: आपली पृथ्वी आता संपणार आहे... मला खूप भीती वाटते! भैरोबा-सायकर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील दुसरीत शिकणार्या पीयूष सायकरच्या तोंडून निघालेल्या या रडक्या सुरांनी क्षणभर सगळे गोंधळले. डोळे अश्रूंनी भरलेले, चेहर्यावर भीतीची स्पष्ट छटा आणि मनात प्रचंड गोंधळ पाहून शिक्षकही थबकले.
वर्गातील एका मैत्रिणीने गप्पा मारताना टीव्हीवर पाहिलेली एक बातमी सांगितली आणि एका निरागस संवादातून घटनेला सुरुवात झाली. मानवी चुकीमुळे पृथ्वी नष्ट होणार आहे ही बातमी लहान मुलांच्या मनावर इतकी खोलवर बिंबली की पीयूषसारख्या संवेदनशील मुलाचे मन हादरून गेले. निसर्गावर प्रेम करणार्या आणि त्यातल्या बदलांमुळे अस्वस्थ होणार्या पीयूषच्या मनात आपण आता कुठे जाणार? हा विचार आला. (Latest Ahilyanagar News)
मुख्याध्यापक हनुमंत येवले यांनी पीयूषच्या अश्रूंमागील कारण समजून घेत तत्काळ त्याची समजूत घातली आणि त्याला धीर दिला. पीयूषसह संपूर्ण वर्गाशी संवाद साधत त्यांनी पृथ्वी वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो, यावर सकारात्मक चर्चा घडवली. पृथ्वी अजून संपणार नाही, पण आपण ती वाचवण्यासाठी जबाबदारीने वागले पाहिजे असे सांगत त्यांनी हवामान बदल, प्रदूषण, वृक्षारोपण यासारख्या विषयांवर उदाहरणे दिली.
या संवादातून पीयूषला केवळ समजूतच नाही, तर एक आश्वासक दिशा मिळाली. मोठा झालो की झाडं लावणार, त्यांना पाणी घालणार असा निर्धार त्यानेच नव्हे, तर संपूर्ण वर्गानेच केला. या वेळी सहशिक्षिका सुनंदा जगताप यांनी या निर्धाराचे स्वागत केले.
भयातून उमलेल जबाबदारीची पालवी!
मुलांच्या मनात पर्यावरणविषयक जाणीव लहान वयातच रुजवण्याची गरज आहे. त्यांनी भीतीने नव्हे, तर जबाबदारीने पृथ्वीच्या रक्षणाचा विचार करावा. यासाठी पालकांनीही पुढाकार घ्यायला हवा. ही जबाबदारी केवळ शिक्षकांची नाही, तर समाजाची आहे.