तारेच्या झटक्याने विद्यार्थिनीचा मृत्यू Pudhari
अहिल्यानगर

औसरकर मळ्यात विद्युत तारेच्या झटक्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

उपचार सुरू असताना रविवारी रात्री तिचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

नगर : शहरातील औसरकर मळा येथे वीजतारेचा झटका बसून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. सृष्टी गणेश दुर्गिष्ट असे तिचे नाव असून, सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. गुन्हा दाखल करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांचे कोतवाली पोलिसांना निवेदन देण्यात आले.

अधिक माहिती अशी, गणेश दुर्गिष्ट यांच्या घराजवळून महावितरणचे कंपनीच्या 11 केव्हीचे विजेच्या तारा गेल्या आहेत. दुर्गिष्ट यांच्या घराजवळ पोल वाकलेला आहे. सृष्टी दुसर्‍या मजल्यावर असताना तिचा हात विद्युत तारांना लागला. त्यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना 3 रोजी सकाळी 9 वा. झाली. तिला उपचारासाठी आनंदऋषी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सिव्हील हॉस्पिटलला उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

महावितरण कंपनीचा पोल घराजवळ वाकलेला आहे. ताराही घराला चिकटून लागलेल्या आहेत. हे पोल सरळ करावे किंवा स्थलांतरीत करावी, अशी मागणी वारंवार केली. परंतु त्याची दखल महावितरण कंपनीने घेतलेली नाही. त्यामुळे ही घटना घडली, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, याप्रकरणी आ. संग्राम जगताप यांनी, महावितरणच्या अक्षम्य चुकीमुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणी जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. तसेच, महावितरण कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, असे पत्रही कोतवाली पोलिस ठाण्यात दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT