मोकाट कुत्री पकडण्यासाठी शहरात फिरणार चार वाहने; महापालिका आयुक्तांची माहिती Pudhari
अहिल्यानगर

Stray Dog Catching: मोकाट कुत्री पकडण्यासाठी शहरात फिरणार चार वाहने; महापालिका आयुक्तांची माहिती

निर्बीजीकरण ऑन कॅमेरा, प्राणी मित्र संघटनेला फटकारले

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकडून व त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीसाठी एक गाडी व कर्मचारी नियुक्त करून कारवाई केली जाईल. तसेच, शहरात कुत्र्यांसाठी फिडिंग पॉईंट तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल.

हॉटेल व स्लॉटर हाऊसमधील वेस्ट रस्त्यावर किंवा कचरा कुंडीवर येणार नाही, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)

प्राण्यांसह नागरिकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य राहील, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांत अहिल्यानगर शहरात काही नागरिकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या.

या पार्श्वभूमीवर नागरिक व प्राणी मित्राच्या सूचना जाणून घेत, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी महापालिकेत बैठक बोलावली होती.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, माजी नगरसेवक निखिल वारे, मनोज कोतकर, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, काका शेळके, कोंडवाडा विभाग प्रमुख दुष्यंत बत्तुल, प्राणी मित्र संघटनेचे सुमित वर्मा, श्रीमती कामत आदींसह इतर प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

या प्रतिनिधींनी काही सूचना मांडल्या. निर्बीजीकरण शस्त्रक्रियेबाबत काही शंका उपस्थित केल्या. निखिल वारे, मनोज कोतकर, बाळासाहेब पवार, काका शेळके, विनीत पाऊलबुद्धे यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, एखादी दुर्घटना घडल्यास प्राणी मित्र संघटना जबाबदारी घेणार का, असा जाब विचारला.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, महापालिकेने पिंपळगाव माळवी येथे 100 ते 150 कुत्र्यांना ठेवता येईल एवढ्या क्षमतेचे शेल्टर हाऊस उभारले आहे. शहरात सुमारे 25 हजार कुत्री असून मागील वर्षभरात 5041 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

ठेकेदार संस्थेला कुत्री पकडण्यासाठी केवळ 10.59 लाखांचे देयक दिले आहे. अद्याप 29 लाखांची देयके थकीत आहेत. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया ऑन कॅमेरा केल्या जात आहेत. त्यामुळे केलेले आरोप मोघम आहेत.

प्राण्यांच्या सुरक्षेबाबत प्राणी मित्र संघटना काम करत आहेत. मात्र, शहरातील नागरिकांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले दुर्लक्षित करता येणार नाहीत. हिंस्र व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजा केल्या जातील. फिडिंग पॉईंटसाठी प्राणी मित्र संघटनांनी शहरात सर्वेक्षण करून कुठे कुठे पॉईंट करता येतील, त्याबाबत पाहणी करून अहवाल द्यावा. पुन्हा महिनाभराने एकत्रित बैठक घेऊन काही उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

संघटनेला फटकारले

मोकाट कुत्र्यांसाठी शेल्टर हाऊस व निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी काही कंपन्यांच्या सीएसआरमधून मदत उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी दहा हजारांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल. मोकाट कुत्र्यांबाबत काम करण्यासाठी आम्ही काम करू, असे संघटना सांगतात.

प्रत्यक्षात काम करायची वेळ आल्यावर, आम्ही संपर्क केल्यावर प्रतिसाद मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महापालिका ही संस्था आहे, कामाची एक कार्यपद्धती आहे, इथे येऊन जे भाषण केले जाते, ते भाषणापुरतेच असते. प्रत्यक्षात काम महापालिकेलाच करावे लागते. इथे प्राण्यांच्या विरोधात कुणीही नाही, सर्व प्राणी प्रेमीच आहेत. मात्र, मागील काही दिवसातील घटनेचे गांभीर्य पाहता नागरिकांची सुरक्षा हेच महापालिकेचे प्राधान्य असेल, अशा शब्दात आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी प्राणी मित्र संघटनेला फटकारले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT