राहुरी: शहरातील बुवाशिंद बाबा तालमीमध्ये असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. त्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. हजारोंच्या संख्येने जमाव एकत्र आल्यानंतर किरकोळ दगडफेक व जाळपोळीचा प्रकार घडला. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी जमावाने नगर-मनमाड रस्त्यावर सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील बुशाशिंद बाबा तालमीमधील महापुरुषाच्या पुतळ्याला कोणीतरी काळा रंग लावल्याचे बुधवारी (दि.26) रोजी दुपारी दिसून आले. विटंबना झाल्याचे दिसताच तरुणांनी एकत्र येऊन संताप व्यक्त केला. शेकडोंचा समुदाय नगर-मनमाड रस्त्यावर एकत्र आल्यानंतर किरकोळ प्रमाणात दगडफेक झाली. जमावाने शहरातून निषेध मोर्चा काढताच व्यापार्यांनी दुकाने बंद करून घेतली. जमावाने नगर-मनमाड रस्त्यावर पुतळा विटंबना करणार्यांचा निषेध करत टायर जाळला.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकाने वेळीच धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले. जमावाचा संताप वाढत असतानाच नगर-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले, सभापती अरुण तनपुरे, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांसह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी धाव घेत जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले.
आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे सांगत तरुणांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. दोन दिवसांत आरोपीला अटक झाले नाही तर पुढील आंदोलनाची दिशा हाती घेऊ, असे आश्वासन आ. कर्डिले यांनी जमावाला दिले. तनपुरे यांनीही जमावाला शांततेचे आवाहन केले.
पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी जमावाशी संवाद साधला. पोलिस पथकासह दंगल नियंत्रण पथकाने हजेरी दिल्यानंतर शहरात सर्वत्र बंदोबस्तासाठी पोलिस पथक तैनात करण्यात आले होते.जमाव सायंकाळी उशिरा फिर्याद दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला. घटनेबाबत आ. शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. दोन दिवसांत आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
...तर ‘जिल्हा बंद’चा इशारा
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला सायंकाळी उशिरा शहरात दाखल झाले. आमदार शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, रावसाहेब चाचा तनपुरे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. दोन दिवसांत आरोपीला अटक न केल्यास जिल्हा बंद आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला.
राहुरी तालुक्यात आज बंद
व्यापार्यांनी गुरुवारी राहुरी शहरासह तालुका बंदचे आवाहन केले आहे. आठवडे बाजार व बाजार समितीमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार असल्याने व्यापारी, शेतकर्यांनी दखल घेण्याचे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.
आरोपींना सोडणार नाही : राकेश ओला
राहुरी येथे पुतळा विटंबनेची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. घटनेतील गुन्हेगार व त्यामागे असणार्या टोळीचा पर्दाफाश केला जाईल. सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.