उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar : चौंडी येथे उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक; ग्रामीण भागात प्रथमच बैठक

दीड एकरावर जर्मन हँगर मंडप, पाच हेलिपॅड; विविध ठिकाणी वाहनतळ

पुढारी वृत्तसेवा

Punyashloka Tercentenary Birth Anniversary of Ahilyadevi Holkar

जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत राज्याच्या ग्रामीण भागात प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे ठरविले आहे. मंगळवारी (दि. 6) चौंडी येथे होणार्‍या या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दीड एकर जागेवर ‘जर्मन हँगर’ प्रकारचा आगप्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे. पाच हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. तसेच विविध ठिकाणी वाहनतळांची निर्मिती करण्यात आली असून, वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. संपूर्ण चौंडी गावात बॅनरमय झाले आहेत. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे स्वागताचे फलक लागले आहेत.

या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, 36 कॅबिनेट मंत्री, 6 राज्यमंत्री, विविध विभागांचे सचिव व प्रशासकीय अधिकारी अशा 42 मंत्र्यांसह सुमारे 600 व्हीव्हीआयपी व 2 हजार विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या स्वागतासाठी आणि सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी 265 फूट लांब व 132 फूट रूंद असा जर्मन हँगर प्रकारचा वातानुकूलित मंडप उभारण्यात आला आहे. मंडपात साडेतीन हजार खुर्च्यांची व्यवस्था, ग्रीन रूम्स, बैठक कक्ष, मुख्य सचिवांचे कार्यालय, पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष, स्वयंपाकगृह व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. (Ahilyanagar News update)

पाच हेलिपॅड उभारण्यात आले असून, हेलिपॅडपासून बैठक स्थळापर्यंत आणि विश्रामगृहांपर्यंत जाणारे रस्ते नव्याने डांबरी करण्यात आले आहेत. संपूर्ण गावातील रस्त्यांची डागडुजीही करण्यात आली आहे. तसेच कर्जत ते चौंडी व जामखेड ते चौंडी दरम्यानच्या सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. मंडपात इंटरनेटची सुविधा पुरवण्यात आली. त्यामुळे बैठकीदरम्यान सर्व शासकीय कामकाज सुरळीत पार पडेल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावात होणारी ही मंत्रिमंडळ बैठक एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि स्थानिक पातळीवर राज्य कारभार पोहोचविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

वाहतुकीच्या मार्गात बदल

6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाने चौंडी येथील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहनांची व नागरिकांची गर्दी होणार आहे. यातून वाहतुकीची कोंडी होऊन कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी चोंडी गावातून जाणार्‍या रस्त्यावर बदल केले आहेत.

हाळगाव - चोंडीमार्गे चापडगावकडे जाणार्‍या वाहनांकरिता हाळगाव-पिंपरखेड-गिरवली-मलठण-चापडगाव असा मार्ग राहील. पिंपरखेड-चोंडीमार्गे चापडगावकडे जाणार्‍या वाहनांकरिता पिंपरखेड-गिरवली-मलठण-निमगाव डाकू चापडगाव असा बदल केला आहे.

गिरवाली - चोंडीमार्गे चापडगावकडे जाणारा वाहनांकरिता गिरवली-मलठण-निमगाव डाकू-चापडगाव असा बदल करण्यात आला आहे. चापडगाव चौंडीमार्गे गिरवलीकडे जाणार्‍या वाहनांकरिता चापडगाव-निमगाव डाकू-मलठण-गिरवली असा वाहतुकीचा मार्ग आहे. हा आदेश शासकीय वाहने, अ‍ॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, मंत्रिमंडळासाठी येणार्‍या वाहनाकरिता सूट देण्यात आली आहे.

पुरणपोळी, शिपी आमटी, भाकरीची मेजवानी

जेवणात पुरणपोळी, शिपी आमटी, मासवडी, शेंगोळे, पुलाव, कुरडई, थालीपीठ, खवा पोळी, मासवडी, कोथिंबीर वडी, हुरडा थालीपीठ, वांग्याचे भरीत, डाळ बट्टी, मटकी, मसाला वांगे, स्पेशल शिंगोरी आमटी, भात, बाजरी भाकरी, दही-धपाटे, आमरस चपाती, वांगी भरीत, भाकरी, अळू वडी, मूग भजी, शेवगा भाजी, ठेचा, भाकरी थाळी, म्हैसूर बौंडा, मांडे आदी खाद्यपदार्थ आहेत.

वातानुकूलित मंडप, संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे

दीड एकर जागेवर ‘जर्मन हँगर’ प्रकारचा आगप्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे. हा संपूर्ण मंडप वातानुकूलित असणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात एसी बसविण्यात आले आहेत. संपूर्ण गावात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्याप्रमाणात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT