राहुरी: तालुक्यातील आरडगाव येथील 4 मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही राजकीय अनास्थेमुळे शेतकर्यांना दिवसा वीज मिळेनाशी झाली आहे. महावितरणकडून अघोषित भारनियमन लादले जात असताना दुसरीकडे रात्री बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत.
आरडगाव येथील सौर प्रकल्प तातडीने सुरू करा, अन्यथा 17 मार्च रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात राहुरी-मांजरी-नेवासा रस्त्यावरील आरडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी दिला.
माजी मंत्री तनपुरे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर, शहराध्यक्ष संतोष आघाव, माजी सरपंच सुनील मोरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणाले की, प्राजक्त तनपुरे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यात शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून बाभूळगाव, वांबोरी व पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देत योजनापूर्तीचा शब्द पूर्ण केला. परंतु सध्याच्या सत्ताधार्यांनी या प्रकल्पातून शेतकर्यांना दिवसा वीज मिळू नये म्हणून प्रयत्न केले.
सद्यस्थितीला उन्हाळ्यामुळे लाहीलाही होत असताना पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. महावितरणकडून अघोषित भारनियमन लादले जात आहे. तसेच बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी भयभीत आहे. दिवसा वीज मिळावी ही शेतक़र्यांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे तनपुरे यांच्या नेतृत्वात 17 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजेपासून आरडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.
श्रेय घ्या, पण वीज द्या: मोरे
आरडगावचे माजी सरपंच सुनील मोरे यांनी सांगितले, की आरडगाव येथील सौर प्रकल्पासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून 20 एकर क्षेत्र दिले. 4 मेगावॉट क्षमतेचा 22 कोटी रुपये निधी खर्च होऊन सौर प्रकल्प उभा राहिला. आरडगाव, मानोरी, वळण, मांजरी, पिंप्री, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, चंडकापूर, शिलेगाव, तांदूळवाडी या गावातील सुमारे 1800 शेतकर्यांना लाभ होणार आहे. राजकीय श्रेय कोणीही घ्या पण शेतकर्यांना दिवसा वीज मिळू द्या.