दिवाळीच्या सणाला कोणतीही हक्काची आर्थिक मदत चुकीच्या नियोजनामुळे न मिळाल्याने पाथर्डी आगारातील एसटी कर्मचार्यांनी आगारप्रमुखांसमोर एसटी कष्टकरी जनसंघ राज्य सरचिटणीस सुभाष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली चटणी-भाकर खाऊन कर्मचार्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत हे अनोखे आंदोलन करण्यात आले. येत्या काळामध्ये मोठे आंदोलन कष्टकरी कर्मचार्यांकडून करण्यात येईल, असा इशारा खेडकर यांनी यावेळी दिला.
या वेळी विजय पारेकर, शिवा खेडकर, डेपो सचिव सुनील कर्नावट, भाऊ गीते, नवनाथ कीर्तने, संतोष बर्डे, विजय डांगे, संतोष घुले, श्याम सुसे, पांडुरंग डमाळे, देवदत्त आंधुरे आदी उपस्थित होते.
राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एस. टी. कष्टकर्यांची दिवाळी अंधारात ठेवल्यामुळे दिवाळीचा सण चटणी-भाकरी खाऊन साजरा करण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठा सण दिवाळी असताना एस टी कर्मचार्यांची यंदाची दिवाळी चुकीच्या नियोजनामुळे अंधारात झाली. वित्त शाखेने योग्य वेळेस जर नियोजन करून जबाबदारीने सरकारबरोबर संपर्क साधत आर्थिक नियोजन केले नाही, म्हणून कष्टकर्यांची दिवाळी अंधारात गेली. फक्त वित्त शाखेच्या गलथान कारभारामुळे सानुग्रह, बोनस अॅडव्हान्स अनुदान दिलेच नाही. बँकेची जी कपात करून ठेवलेली रक्कमही बँकेला दिली गेली नसल्यामुळे बँकेकडून मिळणारे डिव्हिडंट बँक येऊ शकले नाही. ही जरी रक्कम मिळाली असती, तर थोड्या प्रमाणात का होईना दिवाळी सण साजरा करण्यासाठी रक्कम मिळाली असती, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी पाथर्डी आगारातील आगारप्रमुख आरिफ पटेल यांच्या दालनात एसटी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेकडून चटणी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी करत निषेध व्यक्त केला.