श्रीरामपूर: मुंबईत दुसरे घर घेण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी करत येथील डॉक्टर महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपात केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूर शहर पोलिसात मुंबई येथील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर माहेर असलेल्या डॉ. यास्मिन आकिफ इनामदार यांनी याबाबत फिर्याद दिली. डॉ. यास्मिनचा पती आकिफ इनामदार, सासू रूकैया इनामदार, सासरा जैनुद्दिन इनामदार, भाया आरिफ इनामदार, भायाची पत्नी उजमा इनामदार, उजमाची आई जबीन बशीर शेख, उजमाचे वडील बशीर अहमद शेख, सासर्याची बहीण आशा रफिक पटेल, मावस-सासू शकीला दाऊद पटेल, तिचा पती दाऊद पटेल यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
डॉ. यास्मिनचे सासर मुंबईत शिवडी परिसरात ममता सहकारी हौसिंग सोसायटी, भोईवाडा येथे आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार वरील आरोपींनी मुंबईत दुसरी सदनिका खरेदी करण्यासाठी यास्मिनने आई-वडिलांकडून 25 लाख रुपये आणावेत अशी मागणी सुरू केली. ‘तू डॉक्टर असल्याने आणखी पैशंसाठी तुझ्या नावावर कर्ज घे; पण पैसे आणुन दे,’ असे म्हणून यास्मिनचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. काही दिवसांनी मी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे माहीत असतानाही सर्वांनी मला पकडून शिवीगाळ करत मारहाण केली व पोटात लाथाबुक्या मारून माझा गर्भपात केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.