नेवासा: जमीन खरेदीसाठी माहेराहून १० लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून २६ वर्षीय विवाहितेच्या छळप्रकरणी सोनई पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि इतर नातेवाईक अशा १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रतीक्षा महेश दरंदले (रा. सोनई) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, दि. ४ एप्रिल २०२४ रोजी महेश नामदेव दरंदले यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर दोन महिन्यांनी पतीने पुण्यातील आयटी कंपनीतील नोकरी सोडून गावी आल्यानंतर ‘तुझ्यामुळेच नोकरी सोडली’, असे बोलून टोमणे मारले जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी जमीन खरेदीसाठी माहेराहून १० लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर पती महेश दरंदले, सासरे नामदेव दरंदले व सासू लता दरंदले यांनी शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केल्याचे महिलेने म्हटले आहे.
या त्रासाची माहिती वडिलांना दिल्यानंतर त्यांनी सासरी येऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही त्रास सुरूच राहिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनई पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सोनई पोलिस करित आहेत.