कोरडगाव : ठेकेदार कंपन्यांची मनमानी, अधिकार्यांचा उदासीनपणा आणि अर्धवट कामे यामुळे सौर कृषी पंप योजनेंतर्गत सौरपंप बसवण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचे उघड होत आहे. या गैरप्रकारांमुळे शेतकर्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.(Latest Ahilyanagar News)
या योजनेअंतर्गत शेतकर्यांना सौर कृषी पंप अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र, पाथर्डी तालुक्यात या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. सौरपंप बसविताना लागणारे सिमेंट काँक्रीट बेस, खड्डे खणणे, कारागीर मजुरी, वाहतूक व तांत्रिक देखरेख यांचा संपूर्ण खर्च ठेकेदार कंपनीकडून केला जाणे अपेक्षित आहे. सरकारने मंजूर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकर्यांनी केवळ त्यांचा ठरावीक वाटा भरायचा आहे.
परंतु वास्तवात ठेकेदारांकडून हे सर्व खर्च थेट शेतकर्यांकडून वसूल केले जात आहेत. अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. सिमेंट व इतर साहित्य शेतकर्यांकडून खरेदी करायला भाग पाडले जाते. मंजूर प्लेटा न बसवता कमी प्लेट बसवूनही सोलर पंप सुरू दाखवला जातो.
या प्रकारांमुळे शेतकर्यांच्या खिशाला अतिरिक्त बोजा बसत आहे. अधिकार्यांकडून नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असूनही प्रत्यक्षात ठेकेदारांवर कोणतेही बंधन नाही. अनेक ठिकाणी अधिकृत तपासणी न करता थेट सौर पंप दाखवले जाते आणि कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे नोंदवले जाते. शासन अनुदान देऊनही शेतकर्यांची लूट होत असल्याने संतापाची लाट पसरली आहे.
सोलर कंपनीचे व्हेंडर शेतकर्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल करून सरळसरळ लूट करत आहेत. त्या बाबतची लेखी तक्रार सहायक अभियंत्यांकडे केली आहे. जर प्रशासनाने यावर तातडीने कारवाई केली नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.अर्जुन गाडे, शेतकरी प्रतिनिधी