राहुरी : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील एका शालेय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. जय नवनाथ पवार (वय 6) असे मृत बालकाचे नाव असून, तो ढोकरवाडी हद्दीत राहणारा आहे.
जय हा बारागाव नांदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. सकाळची शाळा सुटल्यानंतर बारागाव नांदूर (ढोकरवाडी) हद्दीत जय याचे आई वडिल शेतामध्ये मोलमजुरी करण्यासाठी आले होते. तेथेच जय हा आपल्या दोन बहिणींसमवेत खेळत होता. मोठ्या बहिणीने जय यास सोबत घेत खाऊ आणण्यासाठी लगतच्या दुकानाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
डाव्या कालव्यावरून जात असताना जय याचा पाय घसरला. तो पाण्यात पडल्याचे पाहून बहिणीने आरडाओरडा करताच लगतच्या शेतकर्यांसह आई वडिलांनी धाव घेतली. त्याचवेळी सुधाकर पवार यांनी पाण्यात उडी घेत जय यास पाण्याबाहेर काढले. ग्रामस्थांनी तातडीने राहुरीचे ग्रामिण रुग्णालय गाठले. मात्र उपचारापूर्वीच जय याने शेवटचा श्वास घेतला होता. वैद्यकीय अधिकारी यांनी जय यास मृत घोषित केल्यानंतर नातलगांनी हंबरडा फोडला.
आई वडिलांना जय हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्युने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेनंतर बारागाव नांदूर परिसरामध्ये शोक व्यक्त करण्यात आला. राहुरी पोलिसांनी घटनेची अकस्मात नोंद केली आहे. मयत जय याच्या पश्चात आई, वडिल व दोन बहिणी असा परिवार आहे.