सीना नदी सौंदर्यीकरण Pudhari
अहिल्यानगर

Seena River सीना नदी सौंदर्यीकरण प्रकल्पाला गती; तब्बल दोन मेट्रीक टन कचरा जमा

आराधना वसुंधरेची’ अभियानांतर्गत जलस्त्रोत स्वच्छतेची यशस्वी सांगता

पुढारी वृत्तसेवा

नगर : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेने ’आराधना वसुंधरेची’ या विशेष उपक्रमांतर्गत शहरातील जलस्त्रोत स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन दिवस चाललेल्या या मोहिमेची यशस्वी सांगता होत असताना, सीना नदी परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पालाही सुरुवात झाली आहे.

रविवारी (दि. 27) नगर-कल्याण महामार्गावरील सीना नदीपात्र तसेच शहरातील इतर जलस्त्रोतांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नदीपात्रातील प्लास्टिक व न कुजणारा सुमारे दोन मेट्रिक टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. तसेच, आयुर्वेद कॉर्नरजवळील काठवण खंडोबा रोड पुलाजवळ नगर ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांनी सलग दोन दिवस परिश्रम घेऊन सुमारे एक मेट्रिक टन कचरा हटविला. वडगाव गुप्ता रोडवरील आठरे पाटील पब्लिक स्कूलजवळील महानगरपालिकेच्या विहिरीतूनही प्लास्टर ऑफ पॅरिस व इतर कचर्‍याचे संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या दोन दिवसीय अभियानाच्या दरम्यान एकूण साडेसात टनाहून अधिक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली.

महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी या उपक्रमाच्या सांगतेप्रसंगी नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच, नदीपात्र किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणार्‍यांवर आता कठोर कारवाई करण्यात येईल व दंड आकारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ’आराधना वसुंधरेची’ अभियानाच्या पुढच्या टप्प्यात सीना नदी परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रयत्नातून सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या सहाय्याने नदीपात्राच्या दोन्ही किनार्‍यांवर गॅबियन संरक्षक भिंती उभारण्यात येत असून, त्यामुळे अतिक्रमणास व अस्वच्छतेस आळा बसणार आहे.

याशिवाय, ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवर नदीच्या काठावर प्रदूषण नियंत्रण करणारी झाडे, फुलझाडांचे रोपण, हिरवळीची निर्मिती तसेच नागरिकांसाठी अर्धा किलोमीटर लांबीचा आधुनिक वॉकिंग ट्रॅक, विश्रांतीसाठी खुल्या जागा आणि व्यायामासाठी सोयी-सुविधा उभारण्यात येत आहेत. पुणे महामार्गावरील फुलसौंदर मळा ते कल्याण रोडवरील अमरधाम पर्यंतच्या परिसरात हे काम सध्या सुरू असून, प्रकल्पाच्या अंदाजे वीस टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील सहा महिन्यांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करून नागरिकांना एक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी परिसर देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

अहिल्यानगर महानगरपालिका पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने पावले उचलत असून, नागरिकांच्या सहकार्याने शहर अधिक हरित व स्वच्छ बनवण्याचा संकल्प दृढ केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT