Siddhatek bridge closure Pudhari
अहिल्यानगर

Siddhatek bridge closure: सिद्धटेकच्या पुलावरून 10 दिवस वाहतूक बंद; नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही दुरुस्ती अत्यावश्यक असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: दौंड सिद्धटेक भांबोरारा शिनकरमाळा (रामा 68) या महत्त्वाच्या मार्गावरील सिद्धटेक येथील भीमा नदीवरील मोठा पूल दुरुस्तीच्या कामासाठी 23 मे 2026 रोजी संध्याकाळपासून पुढील दहा दिवस वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही दुरुस्ती अत्यावश्यक असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असून सिद्धटेक येथे पुणे मुंबई या सह राज्यातील विविध भागांमधून गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत मात्र हा पूल बंद राहिल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. पर्यायी मार्गाने भाविकांना आता दर्शनासाठी यावे लागणार आहे. या पुलाचा उपयोग खास करून मुंबई पुणे या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 06 फेब्रुवारी 2026 रोजी स्ट्रक्चरल कन्सल्टंटमार्फत पुलाची सखोल तपासणी करण्यात आली होती. या तपासणी अहवालात पुलाच्या मंदिराकडील भागात तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पुलाच्या संरचनेची सुरक्षितता लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुरुस्तीच्या काळात पुलावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे 23 मेच्या संध्याकाळपासून पुढील दहा दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सिद्धटेकचे सरपंच व ग्रामसेवक यांना अधिकृत पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या असून, स्थानिक नागरिक, व्यापारी, वाहनचालक आणि प्रवाशांना याबाबत माहिती देण्याचे निर्देश प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

सदर दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कर्जत यांच्या मार्फत करण्यात येणार असून सहाय्यक अभियंता श्रेणी2 यांनी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत वाहतूक कोंडी किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, भविष्यातील धोके टाळणे आणि सुरक्षित व टिकाऊ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा या कामामागील मुख्य उद्देश असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत सिद्धटेक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सोबतचा फोटो संग्रह चित्र म्हणून वापरावे यापूर्वी काम करत असताना या पुलावरचा हा फोटो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT