Bribe News Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Police Bribery Case: गुन्हा दाखल करण्यासाठी घेतली ७ हजारांची लाच; श्रीगोद्याचे तीन पोलिस लाचेच्या जाळ्यात

याप्रकरणी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

नगर: अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि त्याची माहिती ॲप्लिकेशनमध्ये भरण्यासाठी तक्रारदारांकडून १० हजारांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती सात हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील तीन कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अंमलदार नितीन अशोक गाडगे (वय 44), राजेश रावसाहेब जाधव (वय 38), दादाराम शिवराम म्हस्के (वय 56) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, तक्रारदाराच्या भावाचा १ जून रोजी अपघात झाला. त्यांच्यावर दौंड येथील पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याप्रकरणी दौंड पोलिसांनी तक्रारदाराच्या भावाचा जबाब नोंदवून हे प्रकरण श्रीगोंदा पोलिस ठाण्याकडे वर्ग केले होते. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक नितीन गाडगे यांच्याकडे होता.

अपघाताच्या ठिकाणाची माहिती आयआरएडी ॲप्लिकेशनमध्ये भरण्यासाठी आणि रीतसर गुन्हा दाखल करण्यासाठी नितीन गाडगे व मदतनीस राजेश जाधव यांनी तक्रारदाराकडे १० हजारांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार १६ ते १८ जून दरम्यान लाचलुचपत पथकाने पडताळणी सापळा लावला असता नितीन गाडगे व राजेश जाधव यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती सात हजार देण्याचे ठरले.

या दरम्यान शासकीय वाहनावरील चालक दादाराम म्हस्के याने मध्यस्थी करीत नितीन गाडगे यांनी मागितलेली सात हजारांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. १८ जून रोजी म्हस्के याला सात हजारांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

ही धडक कारवाई उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, दशरथ लाड यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT