Shrigonda Nominated Member Controversy Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Nominated Member Controversy: श्रीगोंद्यात नामनिर्देशित सदस्य निवडीवरून वाद; अमीन शेख यांच्या नावाने भाजपात अस्वस्थता

आ. विक्रम पाचपुते यांच्या निर्णयानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह स्थानिकांकडून नाराजी व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: नामनिर्देशित सदस्य पदाच्या सोमवारी (दि. 12) झालेल्या निवडीत आ. विक्रम पाचपुते यांनी बेरजेचे राजकारण साध्य करत अल्पसंख्याक समाजाला संधी दिली. संत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष आमीन शेख यांना भाजपच्या कोट्यातून संधी दिली. मात्र, शेख यांच्या निवडीवरून भाजपच्या गोटासह स्थानिकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील संत शेख महंमद महाराज यांचे मंदिर बनवण्यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे. या प्रक्रियेत मंदिर समिती व अमीन शेख यांच्यात मतभेद आहेत. मागील मार्च महिन्यात शहरात मोठे आंदोलन उभे राहिले होते. या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनाही आघाडीवर होत्या. नगरपालिका निवडणुकीत आ. विक्रम पाचपुते यांनी एकहाती सत्ता काबीज करत शहरात पुन्हा स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत भाजपच्या बाजूने मुस्लिम मतदार झुकल्याचे पहायला मिळाले अन्‌‍ तिथेच भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असे राजकीय जाणकारांचे मत आहे. ही बाब लक्षात घेऊनच आ. पाचपुते यांनी कालच्या नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीत मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला अन्‌‍ त्यातूनच अमीन शेख यांना संधी दिली.

एवढेच नव्हे तर श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत श्री शेख महमद महाराज मंदिराचा विकास डोळ्यांसमोर ठेवून ही निवड केली असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र, आता हिंदुत्ववादाच्या पुरस्कर्त्या भाजपने आमीन शेख यांना नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्यपदाची संधी दिल्याने नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या, तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत समाजमाध्यमांवर जाहीर नाराजी व्यक्त करीत राजीनामास्त्र उपसले आहे. त्याच्याबरोबर मंदिर समितीच्या सदस्यांमधूनही नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.

शेख यांच्या निवडीने मागील वर्षी जे आंदोलन झाले होते त्यातील ट्रस्टची वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्याची गावकऱ्यांची जुनी मागणी पूर्ण होणार का? हा खरा प्रश्न आहे. भाजपने माझी निवड करताना कोणतीही अट ठेवलेली नाही. देवस्थानचा विस्तार करण्यास आमचा कधीही विरोध नव्हता आणि नाही.
आमीन शेख, नामनिर्देशित सदस्य
या निवडीतून नेत्यांची हिंदुत्वविरोधी भूमिका स्पष्टपणे उघड झाली आहे. आमचा व्यक्तीला विरोध नाही तर प्रवृत्तीला विरोध आहे
शिवाजी साळुंके, जिल्हा सहमंत्री, विश्व हिंदू परिषद
मंदिराच्या मुद्द्यावर अमीन शेख यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. झालेले निर्णय येत्या काही दिवसांत अंमलात आल्यानंतर वास्तव सगळ्यांसमोर असेल.
आ. विक्रम पाचपुते, भाजप
अमीन शेख ही एकटी व्यक्ती आजवर कोणाच्या पाठबळावर संपूर्ण गावाला वेठीस धरीत होती. या प्रश्नाचे उत्तर या निवडीतून सगळ्यांना मिळाले आहे. दाखवायचे एक अन्‌‍ करायचे दुसरेच ही त्यांची जुनीच पद्धत आहे.
घनश्याम शेलार, आंदोलक, मंदीर समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT