श्रीगोंदा: चांडगाव शिवारात शुक्रवारी कुकडी कालव्याची 13 नंबरची वितरिका फुटल्याने परिसरातील सुमारे 25 एकरवरील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा दाब वाढल्याने ही वितरिका फुटली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुकडी कालव्याचे आवर्तन मागील महिन्यापासून सुरू आहे. कर्जत तालुक्यातील सिंचन पूर्ण झाल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील वितरिकांना पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. गुरुवारी (22) वितरिका क्रमांक तेराला पाणी सोडण्यात आले.
टेल टू हेड असे आवर्तन असल्याने सुरुवातीला चांडगाव शिवारात पाणी सोडले. पहाटेच्या सुमारास अचानक दाब वाढल्याने वितरिकेस मोठे भगदाड पडले. पाणी बाजूच्या शेतात शिरले. त्यात कांदा, खरबूज, कलिंगड यांसारखी पिके वाहून गेली. जवळपास पंचवीस एकर शेतीचे नुकसान झाले.
या नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के म्हणाले, की शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. एवढे मोठे नुकसान होऊनही पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही. राहुल हिरालाल म्हस्के, कांतिलाल बापू म्हस्के, नेमिचंद तुकाराम म्हस्के यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.वितरिका क्रमांक तेरा चांडगाव शिवारात शेवटच्या भागात फुटली होती. तिथे तातडीने दुरुस्ती करून आवर्तन सुरळीत केले आहे.प्रवीण घोरपडे, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग