Resignation Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Health System: श्रीगोंद्याच्या आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का; तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे

लोणी व्यंकनाथ, कोळगाव, मांडवगण आरोग्य केंद्रांतील अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे; प्रशासनाकडून ‘वैयक्तिक कारण’ स्पष्ट, नागरिकांत चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: तालुक्यातील आरोग्य सेवेतील वाद आणि ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर आता श्रीगोंद्याची आरोग्य यंत्रणा मोठ्या पेचात सापडली आहे. तालुक्यातील लोणी व्यंकनाथ, कोळगाव आणि मांडवगण या तीन प्रमुख प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तिघांच्या राजीनाम्यामागे नेमके काय कारण याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

लोणी व्यंकनाथ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झालेल्या चिमुरड्यांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. या निष्काळजीपणाविरोधात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आंदोलन केले. मात्र, प्रशासनाने प्रश्न सोडवण्याऐवजी महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आंदोलनातील पंधरा ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले. यामुळे प्रशासन सूडबुद्धीने वागत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. परिणामी सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले होते.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैला डांगे यांनी हे तीनही राजीनामे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब नागरगोजे यांच्याकडे पाठवले आहेत. प्रशासनाकडून हे राजीनामे ‘वैयक्तिक कारणास्तव’ दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नागरिक आणि राजकीय वर्तुळात याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहे. तीनही प्रमुख केंद्रांतील अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारात अडचणी येण्याची शक्यता आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब नागरगोजे म्हणाले की, तालुक्यातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामा पत्र प्राप्त झाले आहे. मात्र, लोणी व्यंकनाथ येथील घटनेशी या राजीनाम्यांचा कोणताही संबंध नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

ते पुढे म्हणाले, लोणी व्यंकनाथ येथील दोन लहान मुलींच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच चौकशी समितीने लोणी व्यंकनाथ येथे भेट देऊन चौकशी केली आहे. समितीचा अधिकृत अहवाल हाती येताच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आता जिल्हा प्रशासन हे राजीनामे मंजूर करते की संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT