राहुरी: अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी 1 लाख रुपये प्रमाणे भरीव नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनात शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
गेल्या वर्षभर शेतकऱ्यांच्या विविध पिकांस योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. तसेच सातच्या पडणाऱ्या पावसामुळे कांदा चाळी मध्ये सडला असून सोयाबीन, कपाशी, चारा पिके- घास, मका हि पिके हातची गेल्यामुळे झालेला उत्पादन खर्च वाया गेला पुढील शेती मधून मिळणारे उत्पन्न बुडाले असल्या कारणाने आधीच कर्ज बाजरी असलेला शेतकरी आणखीणच कर्जबाजारी झालेला असल्याने तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश सर्व सरकारी यंत्रणेस द्यावे. (Latest Ahilyanagar News)
तसेच निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यास कर्ज माफीची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, सेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे,किरण बाचकर, किरण पवार, सतिष पवार, बाळासाहेब जाधव, दत्तात्रय जाधव, निरंजन पवार, साहेबराव जगताप, सुनील जाधव, जालिंदर मुसमाडे, सुनील ढुस, रवींद्र रिंगे, सुरेश तोडमल, ऋषिकेश धसाळ,चंद्रकांत शिंदें, महेश पवार आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान तहसीलदार पाटील यांनी मंडल अधिकारी, तलाठी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांनी काळजी घेत पंचनामे करून घ्यावे: रवींद्र मोरे
शिवसेना शिंदे गटाचे शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले की, राहुरी परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगत अतिवृष्टी काळात दक्षता बाळगावी. तसेच शासन प्रतिनिधींकडून पंचनामे होत असताना पिकांच्या नुकसानीची माहिती शासकीय दप्तरी नोंदवून घ्यावी, असे आवाहन केले.