दीपक नि. वाघमारे
देवदैठण: शिरूर (जि. पुणे) बाह्यवळण मार्गावर (बायपास) झालेल्या अपघातात वाडेगव्हाण येथील युवा उद्योजक किशोर यादव यांच्या निधनाची घटना थेट संसदेत गेली असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याची गंभीर दखल घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवून तातडीने कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शिरूर बायपास येथील बेकायदेशीर दुभाजक (डिव्हायडर) आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली आहे. शिरूर बायपास येथील संग्राम हॉटेलसमोर ११ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील युवा उद्योजक किशोर यादव यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर खासदार कोल्हे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सचिन कुमार गौतम यांना पत्र पाठवून तातडीने कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
संपूर्ण बायपासचे रोड सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी करताना केवळ एकच ठिकाण नव्हे तर संपूर्ण शिरूर बायपास रस्त्याची सुरक्षा वाढवण्यासाठी खासदार कोल्हे यांनी महामार्ग प्राधिकरणाला काही उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण शिरूर बायपासची प्रत्यक्ष पाहणी करून दुभाजकातील सर्व अनधिकृत कट, मार्गिका आणि धोकादायक यू-टर्न ची व्यवस्था तपासावी, सर्व अनधिकृत मार्गिका तातडीने बंद करून, त्याऐवजी सुरक्षित व अधिकृत यू-टर्नची व्यवस्था करण्यात यावी, संपूर्ण बायपासचे तातडीने रस्ता सुरक्षा परीक्षण (रोड सेफ्टी ऑडिट) करावे, महामार्गावर दिशादर्शक व चेतावणी फलक, प्रकाशव्यवस्था (लाईट्स), रंबल स्ट्रिप्स (कंपन पट्टे) आणि क्रॅश बॅरियर्स (संरक्षक कठडे) यांसारख्या आवश्यक अभियांत्रिकी उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दुभाजक तोडण्याची चौकशी व्हावी
संग्राम हॉटेलसमोरील रस्ता दुभाजक तोडून तयार करण्यात आलेल्या अनधिकृत मार्गिकेमुळे या ठिकाणी वारंवार गंभीर अपघात होत आहेत. सदर मार्गिका ही महामार्ग प्राधिकरणच्या मंजूर आराखड्यानुसार व रस्ता सुरक्षा मानकांनुसार तयार करण्यात आली आहे का? की ती अनधिकृतपणे निर्माण केली गेली आहे? याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पडताळणी करावी. जर हा दुभाजक अनधिकृतपणे तोडला गेल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करून त्यांची कायदेशीर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खासदारांच्या पत्राचे बळ
गेल्या दहा दिवसांपासून शिरूर बायपासवर मिशन झीरो अपघात अंतर्गत सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामपंचायत आणि पोलिस गस्त घालून तोडलेले डिव्हायडर बुजवण्याचे काम जलद गतीने करत आहेत. त्यातच आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिल्यामुळे या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे. महामार्ग प्राधिकरण यावर काय पावले उचलणार याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.