शिर्डी, पुढारी वृत्तसेवा : १३ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन येत्या २२ आणि २३ मार्च रोजी शिर्डी येथे होणार आहे. या संमेलनात परिसंवाद, कीर्तन, भारुड, अभंगवाणी असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. पहिल्या दिवशी भव्य दिंडी सोहळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आज (दि.१३) दिली. (Shirdi Sant Sahitya Sammelan)
महाराष्ट्रातील संत, शूर आणि विरांच्या भूमीत ११ नोव्हेंबर २०११ रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना झाली. या संस्थेमार्फत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करणे आणि समाजाला योग्य दिशा देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. (Shirdi Sant Sahitya Sammelan)
या संमेलनात वारकरी संप्रदाय, महानुभव पंथ, नाथ संप्रदाय, रामदासी संप्रदाय यासारख्या विविध क्षेत्रांतील मराठी संतांच्या साहित्यावर चर्चासत्रे आणि विचारमंथन होईल. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.