शिर्डी: नवी दिल्ली येथील रहिवासी आणि सध्या इटलीत स्थायिक असलेले साईभक्त सतीश कुमार चन्ना यांनी साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपये किमतीचे अत्यंत आकर्षक व हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण केले आहे.
हे ब्रोच एकूण ७५ ग्रॅम वजनाचे आहे. अत्यंत सुरेख, नयनरम्य नक्षीकाम आणि मौल्यवान हिऱ्यांची जोड देऊन हे सुवर्ण आभूषण तयार करण्यात आले आहे. हे ब्रोच साई संस्थानाकडे सुपूर्द केले. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संस्थानच्या वतीने चन्ना यांचा सत्कार केला.
श्री साईबाबा मंदिराला दरवर्षी देश-विदेशातून कोट्यवधी रुपयांचे गुप्त व उघड दान प्राप्त होते. हुंडी, बँक ट्रान्सफर आणि क्यूआर कोडद्वारे दररोज लाखो रुपये जमा होतात. सोन्या-चांदीचे मुकुट, छत्र, ताट, आणि हिरेजडित आभूषणे भक्त मोठ्या श्रद्धेने अर्पण करतात. या दानाचा उपयोग संस्थानामार्फत मोफत प्रसादालय, रुग्णालये आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी केला जातो.