श्रीरामपूर: सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, प्रभाग रचनेनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाले आहेत. त्या अनुषंगाने श्रीरामपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमित झाली असून त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात याव्या, अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची मुंबई येथे भेट देऊन केली आहे. (Latest Ahilyanagar News)
निवडणूक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यामध्ये एकाच कुटुंबाचे विभाजन, मयत व दुबार मतदारांचे नाव समाविष्ट होणे, त्याचबरोबर प्रभागांच्या सीमा ओलांडून एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये 500 ते 700 मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करताना बी एल ओ यांनी स्वतः प्रभागांमध्ये जाऊन मतदार यादीवर काम करणे अपेक्षित होते मात्र हे काम प्रत्यक्षात जागेवर जाऊन न केल्याने ही सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही बाब गंभीर स्वरूपाची असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे विपरीत परिणाम होणार आहेत तसेच हरकतींसाठी देखील कमी कालावधी असल्याचे आमदार ओगले यांनी आयुक्त राज्य निवडणूक आयोग यांच्या निदर्शनास आणून दिले.