नगर: शिंगणापूर देवस्थानच्या बनावट अॅप प्रकरणाच्या चौकशीत रोज वेगवेगळी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागत आहे. देवस्थानच्या दोन कर्मचार्यांच्या बँक खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहार (ट्रान्झक्शन) झाल्याचे उघड झाले असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू झाली आहे. (Ahilyanagar latest News)
शनिशिंगणापूर देवस्थानने तीन अॅपला अधिकृथ परवानगी दिली होती, तर चार बनावट अॅपद्वारे गैरव्यवहार सुरू होता. विधीमंडळात हा प्रश्न चर्चेला आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. धर्मदाय आयुक्तांकडेही विश्वस्तांची सुनावणी सुरू आहे.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शिंगणापूरची माहिती संकलीत केली. तेथील सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक बाबी पोलिसांनी तपासल्या. त्यात दोन कर्मचार्यांच्या बँक खात्याचा संशय बळावला. सखोल चौकशी करता त्यांच्या बँक खात्यातून एक कोटीपेक्षा अधिक व्यवहार झाल्याचे समोर आले. या दोघांचा पगार प्रत्येकी 15 हजार असताना इतकी रक्कम आली कोठून? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
या दोघांच्या बँक खात्यातून काढलेली कोणाला दिली, यात आणखी कोणाचा सहभाग आहे, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
पोलिसांनी आतापर्यंत अधिकृत आणि अनधिकृत अशा सात अॅपची चौकशी केली आहे. यातून देवस्थानला किती रक्कम मिळाली, याचीही माहिती घेतली जात आहे. हे अॅप बनवणारे बाहेरचे लोकं आहेत, अॅपच्या माध्यमातून भाविकांकडून दर्शन, अभिषेकासाठी पाचशे रुपयांपासून रक्कम आकारली जात होती. पोलिस तपासात देवस्थानच्या दोन कर्मचार्यांच्या बँक खात्यात वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून दोन लाख, पाच लाख, तर कधी दहा लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. ही रक्कम कधी टप्प्या टप्प्याने तर कधी सलग जमा झाली आहे. अशाप्रकारे साधारणतः एक कोटी रुपये ‘त्या’ दोन कर्मचार्यांच्या बँक खात्यात वर्ग केलेले आहेत. आता त्यांनी हे पैसे पुढे कोणा-कोणाला दिले, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दोन कर्मचार्यांच्या तपासातून या घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती आहे, हे पुढे येणार आहे. त्यामुळे या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
देवस्थानचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यासंदर्भातही उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जरा सबुरीचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. मात्र आठवडाभरात पोलिस त्याचा उलगडा करतील, असे सांगितले जाते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या टीममध्ये 2021 मध्ये नेमणुका झाल्या होत्या. नुकतेच पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडे एलसीबीचा पदभार देण्यात आला आहे. आता धडाडीने काम करणार्या कर्मचार्यांना या पथकात नियुक्त केले जाणार आहे. एलसीबीची नव्याने बांधणी करणार असल्याचे स्पष्ट संकेत पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले.