Suspended Pudhari
अहिल्यानगर

Shevgaon Water Supply Project: शेवगाव पाणीपुरवठा योजनेत त्रुटी; तांत्रिक सल्लागाराची हकालपट्टी

कामातील विलंब व तांत्रिक चुका उघड; नव्या कंपन्यांकडे प्रकल्पाची जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

बोधेगाव: शेवगाव शहरातील सुवर्णजयंती नगरोत्थान पाणीपुरवठा योजनेत आढळलेल्या गंभीर त्रुटी व कामातील विलंबामुळे तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती अखेर रद्द करण्यात आली आहे. नगराध्यक्ष मायाताई अरुण मुंढे यांनी नगरपरिषदेत मांडलेल्या ठरावास बहुमताने मंजुरी देत मानवसेवा कन्सल्टंट, धुळेचे राजेंद्र सनेर यांची हकालपट्टी करण्यात आली.

दरम्यान, प्रकल्पाच्या पुढील कामासाठी फोरस्ट्रेस इन्फॉकॉन लि., ठाणे व यश इनोव्हेटिव्ह सोल्यूशन एलएलपी (जे.व्ही.), संभाजीनगर या दोन नव्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेकडील माहितीनुसार, संबंधित सल्लागार संस्थेकडून प्रकल्पात वारंवार त्रुटी आढळल्या. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण झाले नाही, तसेच अनेक महिने प्रकल्प प्रलंबित राहिला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना देऊनही अपेक्षित सुधारणा करण्यात आली नाही. पाणीपुरवठा योजनेच्या डीपीआरमध्येही गंभीर तांत्रिक त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे. पाईपलाईन डिझाइन व प्रत्यक्ष कामात तफावत, शहरातील काही भाग योजनेबाहेर राहणे, तसेच टाक्यांच्या क्षमतेत विसंगती आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून संबंधित सल्लागाराचा करार तत्काळ रद्द करून नव्या एजन्सीमार्फत काम पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी जबाबदारी निश्चित करणे व सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सल्लागार बदलास विरोध

मागील आठवड्यात काही नगरसेवकांनी तांत्रिक सल्लागार बदलू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. मात्र, नगरपरिषदेत बहुमताने ठराव मंजूर झाल्याने सल्लागार बदलाचा निर्णय अंतिम ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT