Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Shevgaon Tender Controversy: शेवगाव पालिकेच्या टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेपाचा आरोप; ठेकेदाराची एसपींकडे धाव

नातलगाला टेंडर मिळावे यासाठी दबाव व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

नगर: शेवगाव नगरपालिकेतील टेंडर प्रक्रियेत नगराध्यक्ष पतीचा हस्तक्षेप झाल्याची तक्रार ठेकेदाराने पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. नातलगास टेंडर देण्यासाठी मिस्टरांनी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. राजेंद्र रामदास शिंदे असे तक्रारदार ठेकेदाराचे नाव आहे. माया मुंढे या शेवगाव पालिकेच्या नगराध्यक्षा असून त्यांचे पती अरुण मुंढे यांच्यावर ठेकेदाराने गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

स्ट्रीट लाईट, सोलर हायमॅक्स व विद्युतीकरणाच्या टेंडर प्रक्रियेत सहभागी शिंदे या ठेकेदाराला टेंडर मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. त्याला विरोध केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.

राजेंद्र रामदास शिंदे यांनी विद्युतीकरणाच्या कामासाठी नियमानुसार ऑनलाईन टेंडर भरले होते. त्रुटी असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांचे सहकारी भागवत लव्हाट नगर परिषदेत गेले असता कागदपत्रे स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. नगराध्यक्ष मिस्टर अरुण मुंढे यांनी हस्तक्षेप करत संबंधित टेंडर नातेवाईकांना द्यायचे असल्याचे सांगितले. तसेच टेंडर प्रक्रियेतून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

निविदा प्रक्रिया खरोखर पारदर्शक आहे का, राजकीय हस्तक्षेप होतो का?, ठेकेदारावर दबाव टाकून टेंडर पद्धत मधील स्पर्धा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. यासंदर्भात अरुण मुंढे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मोबाईल कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

काही वेळेतच पोलिस अधिकाऱ्यांचा कॉल

पालिकेत ही घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलिस अधिकारी ओळख सांगत एक कॉल शिंदे यांना आला. महिलेच्या छेडछाडीच्या तक्रारीसंदर्भात हे अधिकारी बोलत असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. मात्र ती संबंधित महिला ओळखीची नसल्याचा दावा करत, खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप ठेकेदार शिंदे यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT