सोनई: शनिशिंगणापूरला शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने मंदिरासमोरील पूजा साहित्याच्या दुकानासमोर पार्क करू देणे व त्यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी पोलिस कर्मचारी दरमहा दीड हजार रुपये घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने केलेल्या कारवाईत या पोलिसाला लाच घेतानाच पकडण्यात आले. अजय कृष्णा ठुबे (वय 39) असे या पोलिसाचे नाव असून, सोनई पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिशिंगणापूर मंदिरासमोर पूजा साहित्याच्या दुकानासमोर भाविकांची वाहने पार्क करू देणे व त्यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी पोलिस कर्मचारी अजय ठुबे दरमहा पंधराशे रुपये हप्ता घेत होते. मागील महिन्याचा व चालू महिन्याचा हप्ता न दिल्याने ठुबे यांनी संबंधित दुकानात येऊन हप्ता न दिल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे संबंधित दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर रपथकाकडे लेखी तक्रार केली होती.
पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात भाविकांचे वाहन पार्क करून कारवाई न करण्याबाबत ठुबेशी चर्चा झाली. त्याने स्वतःकरिता तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे, त्यापैकी दोन हजार रुपये लाचेचे स्वीकारले.
एक हजार रुपये नंतर घेण्याची तयारी दर्शविली. ठुबे यांच्या झडतीत सापडलेले लाचेचे दोन हजार व त्या व्यतिरिक्त स्वखर्चाचे दीड हजार रुपये व मोबाईल ताब्यात घेण्यात आला. पोलिस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांनी फिर्याद दिली. ठुबे यास ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, पोलिस हवालदार अशोक नागरगोजे व प्रकाश नागरगोजे, रामेश्वर ताठे यांनी ही कारवाई केली.