नेवासा: श्रद्धेचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानात तब्बल 2 हजार 474 बोगस कर्मचारी दाखवून देवस्थानाचे पैसे पगाराच्या रूपात आपल्या कार्यकर्त्यांच्या खात्यात वळते केल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी या गैरकारभाराचा सारा हिशेबच विधानसभेत उघड केला.
या भ्रष्ट विश्वतांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे सांगतानाच देवाच्या नावावर भ्रष्टाचार करणार्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा स्पष्ट निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.11) विधानसभेत व्यक्त केला. (Latest Ahilyanagar News)
नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी शनिशिंगणापूर देवस्थानातील गैरप्रकारांबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते. यापूर्वीही लंघे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शनिशिंगणापूरचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने दिलेल्या अहवालात ईश्वराच्या ठिकाणीही लोक किती भ्रष्टाचार करू शकतात, याचा भयानक नमूना पुढे आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या देवस्थानाचा कारभार पूर्वी 258 कर्मचार्यांच्या माध्यमातून अत्यंत व्यवस्थित हाकण्यात येत होता.
तेथे आता 2474 कर्मचार्यांची नियुक्ती केल्याचे भासवण्यात आले. स्थानिक कार्यकर्त्यांची बँक खाती उघडून त्यांच्या खात्यांवर देवस्थानच्या खात्यातून पगाराच्या रूपाने पैसे देण्यात आले. हे कर्मचारी कोठेही अस्तित्वात नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
शनिशिंगणापूर देवस्थानाच्या कर्मचारी भरती घोटाळ्याबाबत प्राप्त झालेल्या अहवालानुसार पोलखोल करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की देवस्थानाच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात तेथे एकही रुग्ण नव्हता. येथे 15 खाटा, 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी दाखविण्यात आले होते. प्रत्यक्षात येथे केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालयाच्या आवारात कुठलीही मोठी बाग नसताना बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी दर्शविण्यात आले. भक्तनिवासामध्ये 109 खोल्या असून त्यासाठी 200 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखविण्यात आले. तेथे चार ते दहा कर्मचारी असावेत. देणगी स्वीकारण्यासाठी आठ आणि तेल विक्रीचे चार अशा बारा काऊंटरवर दोन कर्मचारी काम करताना चौकशी समितीला आढळले.
मात्र, या ठिकाणी 352 कर्मचारी काम करत असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. देवस्थानाकडे स्वतःच्या 13 गाड्या असून त्यासाठी 163 कर्मचारी नियुक्त केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात मात्र 13 कर्मचारी तेथे काम करतात. वृक्षसंवर्धन विभागात 83, शेती विभागात 35 एकर जमिनीसाठी 65 कर्मचारी, पाणीपुरवठा विभागात 65 कर्मचारी, गोशाळा विभागात 82 कर्मचारी, त्यातील 26 कर्मचारी रात्री एकपासून काम करतात असे दर्शविण्यात आले.
पार्किंगचा परिसर स्वच्छ करण्यासाठी 118 कर्मचारी, सुरक्षा विभागात 300 कर्मचारी, प्रसादालयात 97 कर्मचारी दाखवण्यात आले. तसेच 13 वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 176 कर्मचारी, विद्युत विभागाचे एकच युनिट असताना तेथे 200 कर्मचारी, असा 2 हजार 474 कर्मचार्यांचा हिशेब चौकशी समितीने आपल्या अहवालात नमूद केला आहे. या कर्मचार्यांसाठी मस्टर तसेच हजेरीसाठी कुठलीही व्यवस्था नव्हती, असेही फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
याप्रकरणी विधी आणि न्याय विभागाला फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांना बाहेरील पथक पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी आलेल्या तक्रारींनुसार विशेष ऑडिट केले त्या वेळी धर्मादाय विभागाच्या एका अधिकार्याने क्लिनचिट दिली होती. हा अनुभव लक्षात घेता पोलिसांच्या बाहेरील पथकाला चौकशी करण्यास सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शिर्डीप्रमाणे विश्वस्त समिती
विधानसभेने कायदा पारीत करून शिर्डी, पंढरपूर देवस्थानाप्रमाणे शनिशिंगणापूर येथेही समिती असावी, असे निश्चित केले आहे. त्याचीही अंमलजावणी लवकारत लवकर केली जाईल. त्यापूर्वी देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणार्यांना त्यांची जागा दाखविणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘अॅप’बाबत सायबर पोलिसांकडून चौकशी
गेल्या काही वर्षांत शनीशिंगणापूर देवस्थानात बनावट अॅप तयार करून लाखो भाविकांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आमदार विठ्ठल लंघे यांनी सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून केला. ते म्हणाले, की प्रत्येक अॅपवर सुमारे दोन लाख भाविकांची नोंदणी असून प्रत्येकी 1800 रुपयांची देणगी आकारली गेली.
या माध्यमातून कोट्यवधींचा निधी गोळा करण्यात आला, परंतु तो थेट देवस्थानच्या अधिकृत खात्यात जमा न करता खासगी बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आला. याबाबत स्थानिकांनी आंदोलने केली, सायबर क्राईम विभागाकडे तक्रारी केल्या; मात्र अद्याप एकाही प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही, असे ते म्हणाले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, कीत्याचा सायबर पोलिस दलाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या देखरेखीखाली तपास करण्यात येईल.