जीवावर बेततोय ‌‘नगर-मनमाड‌’चा प्रवास; दहा दिवसात सातवा बळी Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Accident: जीवावर बेततोय ‌‘नगर-मनमाड‌’चा प्रवास; दहा दिवसात सातवा बळी

आम जनतेची सहनशीलता संपतेय...

पुढारी वृत्तसेवा

रियाज देशमूख

राहुरी: शेकडो कुटुंबियांना उजाड करणाऱ्या नगर-मनमाड रस्त्याची बळी घेण्याची भूक संपता संपेना झाली आहे. जीवघेण्या आजाराप्रमाणे दैनंदिन जीव जाण्याचा प्रकार नगर-मनमाड रस्त्यावर घडत आहे. राहुरी हद्दीतच 10 दिवसात 7 जणांचा अपघाती मृत्युच्या घटनेने परिसरात संताप पसरला आहे.

शहरात धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले शशिकांत महाराज दुधाडे (वय 65) रा. राहुरी यांचाही काल शुक्रवारी या रस्त्यावर बळी गेला. ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाची बघ्याची भूमिका, यामुळे आता जनतेचीही सहनशीलता संपताना दिसत आहे. काल रस्त्यावर उतरलेली जनता आणि त्यांच्या संतप्त भावना, उद्याची तीव्रता दर्शविणारी दिसली. (Latest Ahilyanagar News)

नगर-मनमाड रस्त्यावर अपघाताच्या घटना वाढलेल्या आहेत. रोज कोठे ना कोठे अपघात घडत आहे. अपघातामध्ये अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे, तर काही निष्पाप जीवांना जीव गमवावा लागत आहे. काल शुक्रवारी (दि.12) रोजी सकाळीच आपल्या नातवांना महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यालयात सोडण्यासाठी दुचाकीवर दुधाडे हे निघाले होते.

नातवांना सोडून ते 7.30 च्या सुमारास घरी येत असताना धर्माडी विश्रामगृह हद्दीत त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. डोक्याला जबर मार लागल्याने ते जागेवरच गतप्राण झाले. घटना समजताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, नंदकुमार तनपुरे, संतोष आघाव, कांता तनपुरे, हर्ष तनपुरे, गजानन सातभाई, राजेंद्र बोरकर, किशोर दराडे, महेश उदावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दुधाडे यांना खाजगी रुग्णालयातून उपचारासाठी आणले. परंतु दुधाडे हे उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. मयत शशिकांत दुधाडे हे शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सुहास दुधाडे व लॅब चालक संकेत दुधाडे यांचे वडिल होत. दुधाडे यांनी कृषी विभागात शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसामन्यांना सहकार्य केले. सेवानिवृत्तीनंतर ते धार्मिक क्षेत्रात अग्रेसर होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुण कृष्णा सोमनाथ गोल्हार (वय 22) हा तरुण अपघातस्थळी जात असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्या तरुणाचा शनि शिंगणापूर फाट्यावर अपघात झाल्याचे समजताच परिसरातील नागरीकांनी रुग्णवाहिकेतून त्यास नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. कृष्णा गोल्हार हा तरुण गंभीर जखमी झाल्याचे समजले आहे.

दरम्यान, राहुरी परिसरात दैनंदिन अपघाताच्या घडतच आहे. काही दिवसांपूर्वीच डिग्रस फाटा येथे सुभद्रा साहेबराव जगधने मयत झाल्या आहेत. वडनेर येथील 28 वर्षीय युवक ज्ञानदेव पाटीलबा बलमे हा नगर येथील एमआयडीसीमध्ये कामासाठी जात असताना त्याच्या दुचाकीला खड्डे चुकविताना कंटेनरने जोराची धडक दिली.

त्या घटनेत बलमे या तरुणाचा मृत्यु झाला. त्यानंतर सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तु साबळे रा. राहुरी खुर्द हे विद्यापीठ हद्दीत सायंकाळचा फेरफटका मारून आपले मित्र प्रा. रामनाथ डोके यांच्यासह दुचाकीवरून घरी परतत होते. त्यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. त्यांचाही जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.

त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील रहिवासी असणारा सद्यस्थितीला वरवंडी (ता.राहुरी) येथे राहणारा तरुण सागर साहेबराव रणदिवे (वय 29) हा तरुण नगरच्या दिशेने जात असताना त्यास वांबोरी फाटा येथे अज्ञात वाहनाने धडक दिली.

त्यामध्ये त्या तरुणाचा जागीच मृत्यु झाला. तर त्यानंतर पुन्हा राहुरीकडून कोल्हारकडे जात असलेला तरुण नितीन बापुसाहेब ढोकणे (वय 32) रा.राहुरी फॅक्टरी या तरुणाचा दुचाकीवरून जात असताना कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. काल शशिकांत दुधाडे यांचाही बळी नगर मनमाड रस्त्याने घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT