शिर्डी/शनिशिंगणापूर: साईबाबा संस्थानला आलेला धमकीचा मेल, त्याबरोबरच भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साई मंदिराची, तसेच शनिशिंगणापूर देवस्थानची सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आली.
जिल्हा पोलिसप्रमुख राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गी, शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी साई मंदिराला भेट देऊन पाहणी करत सुरक्षा यंत्रणेची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या.
जिल्हा पोलिसप्रमुख ओला यांनी शनिवारी (दि. 10) येथील साई मंदिराला अचानक भेट देऊन पाहणी केली. या वेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.
मंदिरात साई दर्शनासाठी साईभक्तांची बारकाईने तपासणी करण्यात येणार आहे. त्याबरोबरच बॉम्बशोधक पथकाद्वारे नियमितपणे साई मंदिराची तपासणी केली जाणार आहे. साई मंदिरासाठी साईबाबा संस्थानचे एक हजार सुरक्षारक्षक असून, त्यांच्या दिमतीला अतिशीघ्र कृतिदलाचे जवान व पोलिस बंदोबस्तासाठी असतील. सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करावी, आदी सूचना देण्यात आल्या.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, साईबाबा मंदिर सुरक्षेबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी पाहणी केली असून भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर व आलेल्या धमकीचे मेल बघता कठोर उपाययोजना बाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याबरोबरच साईबाबा संस्थानच्या त्रिस्तरीय समितीने रविवार (दि. 11) पासून युद्धजन्य परिस्थिती आहे तोपर्यंत साई मंदिरात हार, फुले, प्रसाद नेण्यासही बंदी करण्यात आल्याचे सांगितले.
‘निःसंकोचपणे दर्शनासाठी यावे’
शहरात साईभक्तांची गर्दी रोडावली असून, साईभक्तांनी न घाबरता निःसंकोचपणे साई दर्शनासाठी यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शिंगणापूरला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी पाहणी केली.
शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर, परिसर, पार्किंग ठिकाणे, हार-फुले व इतर वस्तूंच्या दुकानांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शनिवारी (दि 10) शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यातील 10 पोलिस अंमलदार व मंदिर सुरक्षा अधिकारी जी. बी. दरंदले यांच्यासह 17 सुरक्षा रक्षकांसमवेत पाहणी करण्यात आली.
दरम्यान, दर्शनाकरिता आलेले भक्त, ग्रामस्थ, सुरक्षारक्षक, परिसरातील दुकानदार, पार्किंग मालक/नोकरांनी अफवांवर विश्वास ठेवू नका व कोणतीही संशयस्पद हालचाल दिसून आल्यास पोलिसांना, तसेच पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.