भगवान लांडे
धानोरे: राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याची खोदाईही झाली, मात्र संबंधित काम हे विनाटेंडर केले जात असल्याने एका गटाने त्यास कडाडून विरोध करत चांगल्या दर्जाच्या कामासाठी उपोषण सुरू केले, तर दुसऱ्या गटाने हे काम जाणीवपूर्वक बंद पाडले जात असल्याचा विरोधकांवर आरोप करत निषेध सभा घेतली.
अनेक दिवसांपासून सात्रळ बाजारपेठेतील रस्ता प्रलंबित होता. याबाबत जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवल्याचे सांगतानाच, रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू केले. रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. खोदकाम करताना निघणारा मुरूम ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर टाकण्यात आला, याचवेळी सात्रळच्या काही नागरिकांनी संबंधित ठेकेदाराकडे या कामाचे इस्टिमेट मागितले. संबंधित कामाची शासकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी याबाबत कुठलीही माहिती नसल्याचा आरोप एका गटाने केला. तर मंत्री विखे पाटील यांच्या खाजगी निधीतून हे काम सुरू असल्याचे दुसऱ्या गटाने सांगितले. त्यामुळे आरोप प्रत्यारोपातून खोदकाम झालेले रस्त्याचे काम थांबले गेले.
याबाबत जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गाव बंद ठेवून निषेध सभा घेत विरोधकांकडून गावातील चांगल्या कामांना खोडा घातला जात असल्याचा आरोप करणयात आला. त्या निषेध सभेला उत्तर देण्यासाठी दुसऱ्या गटाने काल मंगळवारी थेट रस्त्यावरच उपोषण सुरू केले. यावेळी सात्रळ महसूल मंडल अधिकारी अभिजीत खटावकर, ग्राममहसूल अधिकारी किशोर पवार, ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. परंतु उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते. यावेळी या उपोषण स्थळी सरपंच सतीश ताठे, कैलास कडू, सागर डुक्रे, आण्णामामा सिनारे, कैलास पलघडमल ,चांगदेव शिंदे, हर्षद कडू, नरेंद्र कडू, किशोर भांड, मुन्ना पवार, पोपट कडू, अवधूत चोरमुंगे, आदिनाथ दिघे, अरुण पलघडमल, बबन कडू, धोंडीराम कडू, प्रसाद कडू, राजेंद्र कडू, मनोज कडू, संपत कडू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
राजकीय वादात व्यापारी भरडला
रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे दोन्ही गटाकडून सांगण्यात येत असले तरी रस्त्याचे खोदकाम झाल्याने या रस्त्यावरून ग्रामस्थांची वर्दळ नाही, त्यामुळे परिणामी या रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांना धंदा नाही. त्यामुळे या दोन गटाच्या वादात या ठिकाणचा व्यापारी भरडला गेला आहे हे मात्र निश्चित आता या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी आशावादी राहणे हा एकच पर्याय त्यांच्याकडे शिल्लक आहे.
विरोधकांची भूमिका योग्य नाही: पन्हाळे
व्यापारपेठ ही त्या गावाचा नावलौकिक असते. बाजारपेठेतील रस्त्याचा प्रश्न 40 वर्षांपासून प्रलंबित होता. पालकमंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा केला. रस्त्याचे काम मार्गी लागले; परंतु चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचा व भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप योग्य नाही. त्यांनी राजकीय विरोध बाजूला ठेवून चर्चेस यावे आम्ही त्याचे स्वागत करू, असे माजी उपसरपंच रमेश पन्हाळे, ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे यांनी सांगितले.
गावच्या हितासाठी जाब विचारणारचः कडू
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या काळात याच रस्त्याचे टेंडर निघाले असताना याच मंडळींनी या रस्त्याचे काम बंद पाडले. खाजगी निधी यापूर्वी का आला नाही? खाजगी निधी जर या कामासाठी वापरला जाणार असेल तर ते निवडणुकीचे प्रलोभन आणि सत्तेचा गैरवापर आहे. कोट्यवधीचा निधी या कामावर खर्च होणार असेल आणि त्या कामाचे टेंडर नसेल किंवा त्या कामावर कोणाचेही नियंत्रण नसेल, सुपरव्हीजन नसेल, याबाबत विचारणा तर करावीच लागेल. जाब विचारून बदनामी होत असेल तरी चालेल पण जाब हा विचारतच राहणार, असे युवा नेते किरण कडू म्हणाले.