अहिल्यानगर : सारोळा कासार येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी साडेचार कोटींचा खर्च करून चार मजली इमारत उभी करत राज्यासमोर ‘लोकसहभागाचा’ आदर्श उभा केला आहे. शनिवार दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता या इमारतीचे लोकार्पण केले जाणार आहे. कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त ग्रामशिक्षणाचा हा सोहळा गावाच्या प्रगतीचे नवे पर्व सुरू करणारा ठरणार आहे.(Latest Ahilyanagar News)
सारोळा कासार हे गाव शिक्षणप्रेमी, त्याग भावना, कृतज्ञता आणि दानशूरता यासाठी ओळखले जाते. शिक्षकांचे व सैनिकांचे गाव म्हणून या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या ठिकाणी शाळेची नवीन इमारत असावी, असे ग्रामस्थांचे स्वप्न होते. त्यासाठी ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, रयत सेवक, उद्योजक, व्यवसायिक, दानशूर व्यक्ती तसेच शिक्षणप्रेमींनी पुढे येऊन सुमारे 4.5 कोटी रुपये खर्चून नव्या चार मजली शाळा इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले. गावाच्या शैक्षणिक प्रगतीला नवे बळ मिळाले आहे.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138 व्या जयंती सोहळ्याचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सारोळा कासार (ता. अहिल्या नगर) येथे शनिवार दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलिस निरीक्षक, मुंबईचे नीलेश धामणे आणि जळगावचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने असणार आहेत. या प्रसंगी नामवंत व्याख्याते प्रा. डॉ.वसंतराव हंकारे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमात मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षा, प्रवेश परीक्षा तसेच कला, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास सरपंच, चेअरमन, विविध लोकप्रतिनिधी, आजी माजी अधिकारी, प्राचार्य, शिक्षक व ग्रामस्थांसह सर्व समाजघटक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.