Sanjay Gaikwad Controversy Pudhari
अहिल्यानगर

Sanjay Gaikwad Controversy: गायकवाड धमकी प्रकरण तापले; ‘शिवाजी कोण होता?’ पुन्हा चर्चेत

सत्यजीत तांबे यांची टीका; नव्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांची समतोल ओळख पोहोचवण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

नगर: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‌‘शिवाजी कोण होता?‌’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण राज्यात गाजत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून, लोकप्रतिनिधी कसा नसावा, याची चर्चा स्वतः आमदार संजय गायकवाड यांनीच घडविल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, सोशल माध्यमांतून मत व्यक्त करताना, आ. तांबे यांनी गोविंद पानसरे लिखित ‌‘शिवाजी कोण होता?‌’ या पुस्तकाच्या दहा हजार प्रतींचे वाटप केल्याच्या आठवणींना उजाळा दिला.

आमदार तांबे यांनी एक्स पोस्टद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‌‘चुकीच्या पद्धतीने का होईना, संजय गायकवाड यांनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला, हात घालून राज्यात पुन्हा एकदा ‌‘शिवाजी कोण होता?‌’ या विषयावर चर्चा सुरू करून दिली. त्याच बरोबर ‌‘लोकप्रतिनिधी कसा नसावा‌’ यावरही चर्चा सुरू करून दिल्याचे आ. तांबे म्हणाले. कॉ. गोविंद पानसरे यांचे ‌‘शिवाजी कोण होता?‌’ हे पुस्तक 1987 साली प्रकाशित झाले.

म्हणजे आज जवळपास 39 वर्षांनंतरही पुस्तक न वाचता हा विषय पुन्हा चर्चेत आणला. यातूनच या पुस्तकाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, अशीही टिप्पणी आमदार तांबे यांनी केली. कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी भ्याड हल्ला झाला आणि 20 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांचे निधन झाले. नेमके त्याच काळात 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती. पानसरेंवरील हल्ल््याच्या निषेधार्थ आम्ही अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहरात ‌‘शिवाजी कोण होता?‌’ या पुस्तकाच्या सुमारे 10,000 प्रती वाटून प्रबोधन करण्याचा छोटासा प्रयत्न केला होता, अशी आठवण आमदार तांबे यांनी सांगितली.

गायकवाडांचे संभाषण.. हसावे की रडावे..?

आ. गायकवाड यांचे फोनवरचे संभाषण ऐकून हसावे की रडावे, असे मला झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला आई मानले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणि शत्रूपक्षातील स्त्रियांचाही नेहमी आदर केला. त्यामुळे गायकवाड यांनी वापरलेल्या शब्दांमुळे महाराज कधीच माफ करणार नाहीत, हेही तितकेच खरे, असेही आ. तांबे यांनी म्हटले आहे.

‌‘ते‌’ शिवाजी महाराज वेगळे का वाटतात?

स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकदा वादग्रस्त लिखाण अन्‌‍ विधानं केली जातात. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात शिकवले जाणारे शिवाजी महाराज आणि समाजमाध्यमांतून दिसणारे शिवाजी महाराज, यांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या बालमनातही संभ्रम वाढू लागला आहे. ‌‘बाबा, तुम्ही सांगता ते आणि शाळेत शिकवतात ते शिवाजी महाराज वेगळे का वाटतात?‌’ असा प्रश्न मुलीने उपस्थित केल्यावर आ. सत्यजित तांबे यांनीही बालमनातील गोंधळावरून चिंता व्यक्त करत, आजच्या नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची खरी आणि समतोल ओळख पोहोचणे गरजेचे असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.

अभ्यासक्रमातील मुद्द्यांवर भाष्य करताना, आमदार तांबे यांनी त्यांच्या मुलीसोबत चर्चेचा किस्सा सांगितला. ‌‘मुलगी अहिल्या हिने विचारले- बाबा, तुम्ही सांगता ते आणि शाळेत शिकवतात ते शिवाजी महाराज वेगळे का वाटतात? यावर आमदार तांबे म्हणतात, की एक गोष्ट स्पष्ट झाली, की आजच्या नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची खरी आणि समतोल ओळख पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे.

आ. तांबे यांच्या मुलीच्या प्रश्नाप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या मनातही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत असतील. त्याची वस्तुनिष्ठ साधार उत्तरे त्यांना देणे अभिप्रेत असल्याचे आ. तांबे म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT