शिवाजी क्षिरसागर
संगमनेरः तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामुळे ३० गावे ७५ वाड्यांना २२ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र टँकर सुरू ठेवण्याची मुदत येत्या ३० जूनपर्यंतचं आहे. यामुळे जुलै महिन्यात टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरु राहण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यंदा पाऊस लांबला. जून महिना संपत आला तरी अनेक भागात पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. संगमनेर तालुक्यात दोन दिवस पावसाने हजेर लावली असली तरी, हे प्रमाण अत्यल्प आहे. आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
सध्या तालुक्यात ३० गावे ७५ वाड्यांना २२ टँकरर्सने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून तालुक्यात अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर टँकसरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जून महिन्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे, मात्र यंदा पावसाने ताण दिल्याने पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात पिण्याबरोबरचं जनावरांच्या चाऱ्याचा पाणीप्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
अशातचं टँकर्स सुरू ठेवण्याची मुदत जिल्हा अधिकाऱ्यांनी ३० जून पर्यंत दिली आहे, मात्र जून महिना संपला तरी, जुलैमध्येदेखील टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.
यासाठी जुलै महिन्यात टँकर सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची गरज निर्माण झाली आहे, मात्र अवघे पाच दिवस उरले तरी, अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत पंचायत समितीला कुठलेचं आदेश प्राप्त झाले नाहीत. यामुळे जुलै महिन्यातील टँकर्स सुरु राहण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टँकर्स बंद झाल्यास ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आणखी तीव्र होणार आहे.
यासाठी आत्ताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. टँकर्स सुरू ठेवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाल करणे गरजेचे आहे. संगमनेर पंचायत समितीकडून याबाबत सध्या हालचाल सुरु नाही. परिणामी जुलै महिन्यात ग्रामीण भागात टँकर्सने पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
‘संगमनेर तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेतला जाणार आहे. टँकर्स सुरू ठेवण्यासाठी आढावा घेतल्यानंतरचं याबाबत निर्णय घेतला जातो. अद्याप पाणी टँकर्स सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली नाही. ३० जूननंतर टँकर्स सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.प्रवीण सिनारे, गटविकास अधिकारी, संगमनेर.