संगमनेर: अनाधिकृत ठिकाणी वाहन उभे (पार्किंग) केल्यावर पोलिस सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करतात. मात्र, सरकारी वाहन अनधिकृत ठिकाणी उभे केल्याबद्दल पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी तहसीलदारांच्या वाहनावरच दंडाची कारवाई केली आणि कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचे दाखवून दिले.
शहरात गुरुवारी (दि.२) दुपारी उपवर्गीकरणाच्या विरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा येणार होता. त्यामुळे नवीन नगर रोडच्या कडेला दुकानांसमोर अस्ताव्यस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांवर पोलिसांनी दंड आकारण्याला सुरुवात केली. पोलिस निरीक्षक समीर बारवकर स्वतः तेथे आले. अनेकांनी स्वतःहून वाहने काढून घेतली.
त्यातच प्रांताधिकारी कार्यालयासमोर वाहनांवर कारवाई सुरू असताना तहसीलदारांचे वाहन (एमएच १६ डीजी ३२८४) चालकाने पोलिसांसमोरच रस्त्याच्या कडेला उभे केले. एकीकडे पोलिस वाहने हटवत असताना दुसरीकडे तहसीलदारांच्या चालकाने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले.
वाहनात तहसीलदार नसल्याने पोलिस निरीक्षक बारवकर यांनी चालकाला वाहन बाजूला घेण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेला प्रतिसाद न दिल्याने बारवकर यांनी चालकाची चांगलीच कानउघाडणी केली. सरकारी वाहन असतानाही अडथळा निर्माण केल्याने त्यांनी वाहतूक पोलिसाला सूचना करून तहसीलदारांच्या वाहनावर दंड आकारण्यास सांगितले.
पोलिसांनी तत्काळ दंड आकारला. त्यानंतर चालकाने तेथून वाहन काढून घेतले. पोलिसांनी तहसीलदारांच्या वाहनावर कारवाई केल्याचे पाहून परिसरातील व्यापारी, नागरिकांनी कौतुक केले.