Sangamner Sand Smuggling Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Sand Smuggling: संगमनेरात वाळू तस्कर टोळीवर मध्यरात्री धडक कारवाई

प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा; 7 जण अटकेत, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पिंपरणे प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करणाऱ्या तस्कर टोळीविरुद्ध तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री धडक कारवाई केली. छापा टाकून पोलिसांनी 60 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रवरा व मुळा नदीपात्रातून सर्रास वाळू चोरी केली जात आहे. महसूल विभाग मात्र ‌‘अर्थ‌’पूर्ण बघ्याची भूमिका घेत आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना, गुप्त खबऱ्याने माहिती दिली की, पिंपरणे शिवारात नदीपात्रात ताहीर शेख साथीदारांच्या मदतीने जेसीबी व ट्रॅक्टरमधून चोरून वाळू वाहतूक करीत आहे.

पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री 12:45 वाजेच्या सुमारास छापा टाकला. 7 जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांमध्ये सूरज संजय पवार ( 22), विशाल राजू रणशूर ( 20, दोघेही रा. घुलेवाडी), ऋषीकांत कारभारी वर्पे ( 28, रा. कनोली), संतोष पंढरीनाथ भवर (40, रा. जोर्वे), शशिकांत शिवाजी नागरे (25, रा. मालुंजे), ताहीर सुलतान शेख (28, रा. डिग्रस) व अविनाश अनिल मिसाळ (24, रा. घुलेवाडी) यांचा समावेश आहे.

सर्वांनी संगनमताने पर्यावरणाचा ऱ्हास करीत गौण खनिज चोरी केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. या छाप्यात 60 लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सचिन सोनवणे यांनी फिर्याद दिली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यात प्रवरा व मुळा नदी पात्रातून राजरोस चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. याविरुद्ध तहसीलदार धीरज मांजरे व तलाठी, सर्कल कारवाई का करीत नाहीत. पोलिसांनी पिंपरणे परिसरात कारवाई केल्यानंतर ‌‘महसूल‌’ने नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तस्कर राजरोस जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT