Sangamner Murder Protest Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Murder Protest: अपघात की घातपात? संगमनेरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या

खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे; खांडगाव उड्डाणपुलाजवळ तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील खांडगाव उड्डाणपुलाजवळ गुरुवारी झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेहासह शुक्रवारी रात्रभर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. शनिवारी दुपारपर्यंत ठिय्या सुरूच होता. अखेर अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला.

सुरज सुर्यभान शिंदे (रा.वैदुवाडी,संगमनेर खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांसह समाज बांधव शुक्रवारी रात्री आंदोलनात सहभागी झाल्याने पोलिस ठाण्याचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करावे लागले. पोलिसांना कामकाज करणे अवघड झाले. खुनाचा गुन्हा दाखल करा, आम्हाला न्याय द्या, अशा घोषणा देण्यात आल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी कुटुंबिय, नातेवाईकांशी चर्चा केली.

मात्र कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शुक्रवारी रात्रभर व शनिवारी दुपारपर्यंत ठिय्या सुरू होता. अप्पर अधीक्षक सोमनाथ वाकचौरे शनिवारी (दि.14) दुपारी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्ते व कुटुंबीयांशी चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन वाकचौरे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शोकाकुल वातावरणात शनिवारी मृत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुरुवारी रात्री नाशिक पुणे महामार्गावरील सुरज शिंदे हा दुचाकीवरुन जात असताना खांडगाव उड्डाणपुला जवळ एका व्यक्तीला दुचाकीचा धक्का लागल्याने तो खाली पडून जखमी झाला. रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्याचे निधन झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईक मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेसह पोलिस ठाण्यात आले. हा अपघात नसून घातपात खून असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार अशी आक्रमक भूमिका घेतली.

अपघातात मृत तरुणाच्या पत्नीची फिर्याद घेतली जाणार आहे. रात्री गुन्हा दाखल करून घेतला जाईल.
समीर बारवकर, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT