संगमनेर : शहरातील मालदाड रोड येथे एका गल्लीत पाकीट वाटप करत असलेल्या संशयावरून कासारा दुमाला येथील एका तरुणाला परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.
फिरते भरारी पथकाचे संगमनेर तालुका उपकृषी अधिकारी रवींद्र वळवी यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन श्याम रुपवते (वय 24) याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले.
संगमनेर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून उमेदवार व राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रचारात व्यस्त आहे. संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील जगदंबा कॉलनीमध्ये शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अर्जुन रुपवते नावाचा हा तरुण पैसे असलेली पाकीट वाटप करत असल्याचा काहीना संशय आला. त्यामुळे परिसरातील तरुणांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रुपवते यास चौकशीसाठी शहर पोलिस ठाण्यात आणले. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्यास ताब्यात घेतले. याबाबतचा अधिक तपास संगमनेर शहर पोलिस करत आहे.
दरम्यान, भरारी पथकाने रुपवते याची कसून तपासणी केली असता दोन महागडे मोबाईल आणि रोख रक्कम असलेले पाकीट असा असा एकूण 1 लाख 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.