संगमनेर: जिल्ह्यातील सर्वात मोठी व समृद्ध बाजारपेठ असलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेत अमृत उद्योग समूहाच्या सहकारी संलग्न संस्थांमुळे 150 कोटी रुपये वेगवेगळ्या मार्गाने सभासद, शेतकरी, कर्मचारी यांच्या खिशात आले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीला शेकडो कोटींची बाजारात उलाढाल होणार आहे. मागील एक वर्षापासून अस्थिर वातावरणामुळे ठप्प झालेली शहरातील बाजारपेठ दीपावलीच्या सणानिमित्त पुन्हा एकदा फुललेली दिसली आहे. (Latest Ahilyanagar News)
संगमनेरच्या बाजारपेठेचे आकर्षण जिल्ह्यासह राज्याला राहिले आहे. येथे सणासुदीसह लग्न सराईत होणारी उलाढाल हा चर्चेचा विषय असतो. सुसंस्कृत, शांत, सुरक्षित, विकासातून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गतिमान नेतृत्व, सक्षम सहकार, शैक्षणिक व सामाजिक सलोखा यामुळे संगमनेर शहर हे देश पातळीवर विकासाचे मॉडेल ठरले आहे. मात्र मागील एक वर्षापासून संगमनेरमध्ये मोठे अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे.
अस्थिरता व अस्वस्थता यामुळे संगमनेरची बाजारपेठ ठप्प झाली होती. संगमनेरच्या बाजारपेठेवर बाहेरील तालुक्यांचाही मोठा विश्वास मात्र मोर्चे, आंदोलने, बटबटीत वाटणारी फ्लेक्सबाजी आणि अस्थिर वातावरण यामुळे बाहेरच्या नागरिकांचा संगमनेरकडे येण्याचा कल कमी झाला होता. यामुळे शहरातील व्यापारावर याचा मोठा परिणाम झाला. शेतकऱ्यांना चांगले लाभांश, बोनस, रेबिटचे वाटप करण्यात आले आहे. या संस्थासह तालुक्यातील विविध संस्थांमुळे संगमनेरच्या बाजारपेठात मोठी गर्दी दिसत आहे.
शहरात मेन रोड, नवीन नगर रोड, बाजारपेठ, नाशिक रोड यामध्ये कपडे, सोने, विविध गृह उपयोगी वस्तू,मिठाई, फटाके, रोषणाईचे दिवे, खरेदी करण्यासाठी नागरिक व महिलांची मोठी गर्दी आहे. संगमनेर शहरात होणारी गर्दी लक्ष वेधून घेत आहे. दुकानांत गर्दीमुळे खरेदीसाठी नंबर लावावे लागत आहेत. सर्वत्र उत्साह, आनंद चैतन्य असल्याने संगमनेर तालुक्याची दिवाळी आनंदात आहे. रस्त्यांवर बाल गोपाळ व चिमुकल्यांची धांदल, माहेरवासिनी, सासरवासीची लगबग या आनंदमय वातावरणामुळे सर्वत्र उत्साह दिसून येत आहे.
संगमनेकरांची दिवाळी गोड
दीपावली निमित्ताने माजीमंत्री बाळासाहेब थोराताच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहातील थोरात सहकारी साखर कारखान्याचे 26 कोटी, राजहंस दूध संघाचे 41 कोटी, तालुक्यातील विविध संलग्न सहकारी संस्था, तालुक्यातील विविध सेवा सोसायटी, दूध संस्था, शैक्षणिक संस्था, बँका,पतसंस्था मिळून सुमारे 150 कोटी रुपये बाजारात आले आहे. यामुळे संगमनेरच्या बाजारपेठत खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.