संगमनेरः पारंपरिक वेशभूषा.., लयबद्ध ठेका.., सामूहिक संचलन.., ढोल- ताशांचा गगणभेदी गजर, वेगळेपण सिद्ध करण्याची चढाओढ.., ओसंडून वाहणारा उत्साह.., प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद0, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीगणपती बाप्पांचा जय-जयकार, सांस्कृतिक विविधतेचे दर्शन असे अफलातून वेगळेपण सिद्ध करीत, ‘आय लव संगमनेर,’ या पारंपरिक वादकांच्या महामेळावाने संगमनेरकरांची मने जिंकली. वादकांच्या या महामेळाव्यात युवतींचा सहभाग वैशिष्ट्येपूर्ण ठरला! (Latest Ahilyanagar News)
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून बस स्थानक परिसरात वादकांचा महामेळावा पार पडला. संगमनेरकरांसाठी ही जणू एक पर्वणी ठरली.
तांडव, रुद्र, एकलव्य, छावा, हिंदू राजा, या विविध ढोल पथकातील तब्बल 400 या मेळाव्यात उत्स्फूर्त कलाकारांनी सहभाग नोंदविला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, गिरीश मालपाणी, दिलीप पुंड, डॉ.मैथिली तांबे, नितीन अभंग व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्रीगणेशोत्सवाच्या औचित्याने, संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये, ‘आय लव संगमनेर,’ ने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मराठी- हिंदी गितांच्या चालींवर ढोल- ताशांच्या गजरात शहर दुमदुमले.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संगमनेरला समृद्ध परंपरा आहे. सांस्कृतिक वैभव लाभलेल्या या भूमीने देशाला दिशा दिली. श्रीगणेशोत्सवाचा आनंद लुटताना बंधुभाव अधिक वाढीस लावावा.
यावेळी गिरीश मालपाणी व डॉ.जयश्री थोरात यांनी शुभेच्छा दिल्या. संगमनेर तालुक्यातील तब्बल 15 हजार युवकांची उपस्थिती, हे या महावादन व महामेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले.
‘पारंपरिक सणोत्सव साजरे करताना सांस्कृतिक विचारांची देवाण-घेवाण केली जाते. सर्व धर्म समभाव, बंधुभाव असलेल्या आदर्श व सुंदर शांततामय संगमनेरचा नावलौकिक सर्वांना जपायचा आहे. सांस्कृतिक क्षेत्रात संगमनेरचे मोठे नाव आहे. ‘आय लव संगमनेर,’ चळवळीतून सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठे व्यासपीठ आमदार सत्यजित तांबे यांनी उपलब्ध केले आहे. शहरासह आदर्श तालुका म्हणून येथील तरुणांनी, देशभर संगमनेरचा लौकिक वाढवावा, शांतता भक्तीभावाने श्रीगणेशोत्सव साजरा करावा.-माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संगमनेर.
‘संगमनेरचे युवक काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत वादन करतात. यासर्वांना एकत्र करून, महावादन मेळावा पार पडत आहे. युवक- युवतींचा यात मोठा सहभाग आहे. संगमनेरकर एकरूप होऊन, श्रीगणेशोत्सवानिमित्त श्रीगणेशाला महावंदन करीत आहेत. विविध जाती- धर्माचे लोक एकत्र येऊन, सर्वांचे सण आनंदाने साजरा करतात, हे संगमनेरचे वैशिष्ट्ये आहे. मातीतील कलाकारांचा गौरव करुन, संगमनेरचा गौरव देशभर पोहोचविणारा हा महावादन सोहळा संस्मरणीय ठरला आहे.-आमदार सत्यजित तांबे, संगमनेर.