Sanjay Malpani Abu Dhabi Experience Pudhari
अहिल्यानगर

Sanjay Malpani Abu Dhabi Experience: युद्धस्थितीत आबुधाबीत अडकलेले संगमनेरचे उद्योजक; संजय मालपाणींचा अनुभव

विमानसेवा ठप्प असतानाही अमिराती सरकारकडून पाहुण्यांची व्यवस्था; दोन दिवसांनी मायदेशी सुखरूप परत

पुढारी वृत्तसेवा

एका कार्यक्रमासाठी संगमनेर येथील प्रसिद्ध उद्योजक संजय मालपाणी नुकतेच संयुक्त अरब अमिरातीत गेले होते. पश्चिम आशियात भडकलेल्या युद्धजन्य स्थितीत ते आबुधाबी येथे अडकले असताना त्यांना आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत...

आम्ही आबूधाबीला एका वैवाहिक कार्यक्रमासाठी आलो होतो आणि इराक-इस्राइल युद्धामुळे येथेच अडकून पडलो. अरब अमिरातीतली सर्व विमानतळे ठप्प झाली आणि सर्वच विमान उड्डाणे रद्द झाली. आम्ही ज्या अमिरात पॅलेसमध्ये थांबलेलो होतो, तेथील व्यवस्थापनाने आम्हाला कळवले, की ‌‘तुम्ही आमच्या देशाचे पाहुणे आहात. आमची विमानसेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला याच हॉटेलमध्ये ठेवावे असा सरकारी आदेश आम्हाला आलाय. या देशातील सर्वच हॉटेल्समध्ये देशात अडकलेल्या पाहुण्यांची निवास व भोजन व्यवस्था सरकारने केली आहे. तुम्ही निश्चिंतपणे येथे राहू शकता...‌’ युद्धात अडकलेले असताना हा एक सुखद आश्चर्याचा धक्का होता.

रात्री आम्हा सर्वांच्या मोबाईलमध्ये कर्कश आवाजात 2-3 वेळा अलर्ट मेसेज सरकारकडून आला. रात्री बाहेर न पडण्याची व खिडक्यांचे परदे लावण्याची सूचना या मेसेजमध्ये होती. स्वाभाविकपणे आम्ही परद्याआडून आकाशाकडे परत परत पाहत होतो. पण एकही क्षेपणास्त्र आम्हाला दिसले नाही. दिवसभरात लष्करी विमानांचा आवाजही आला नाही. नाही म्हणायला एक दोन नागरी विमाने आकाशात दिसली. रस्त्यांवरील गाड्यांचे आवागमन मात्र नेहेमीसारखेच होते.

दुसऱ्या दिवशी नाश्ता करून आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो व टॅक्सी बुक केली. क्षणात टॅक्सी हजर झाली. आम्ही आबुधाबीचा राजवाडा व इतर काही प्रसिद्ध ठिकाणे पाहून आलो. स्वामीनारायण मंदिर सोडले तर सर्व प्रेक्षणीय स्थळे उघडी होती. बाजार व मॉल्स पण उघडे होते. युद्धजन्य परिस्थितीचा मागमूसही नव्हता. सर्वत्र रमजानच्या सजावटीचा झगमगाट होता.

भारतातून मात्र सारखे फोन येत होते. आम्ही सुरक्षित आहोत का याची विचारणा होत होती. कधी फोन न करणाऱ्यांचे फोन व मेसेज पाहून मलाच माझी काळजी वाटू लागली. आपण फारच मोठ्या संकटात अडकलोय की काय हे पाहायला मी रूममधला टीव्ही चालू केला. भारतातील टीव्ही वाहिन्यांवर या युद्धाचे इतके भयंकर कव्हरेज सुरू होते की जणू आपल्यावरच बाँब पडताहेत असे वाटावे. मध्येच ब्रेकिंग न्यूजचा भोंगा वाजवून जुन्याच बातम्या परत परत दाखवल्या जात होत्या. बाहेर शांतता होती पण टीव्हीवरचा हल्लकल्लोळ पाहताना आपल्यावरच फायटर जेटमधून गोळे पडताहेत असे वाटत होते. कारण नसताना बीपी वाढत होता. टीव्ही बंद केला आणि मला युद्ध थांबल्यासारखे वाटू लागले.

माझी वृद्ध आई मात्र प्रचंड काळजीत होती. तिची चिंता कमी व्हावी म्हणून मी तिला व्हिडिओ कॉल केला. आम्ही सर्व मजेत हॉटेलमधल्या चकचकित भांड्यात जेवण करतोय हे पाहून तिचाही जीव भांड्यात पडला. पण शेवटी आई ती आईच. घरी पोहोचणार नाही तोपर्यंत ती चिंता करत राहणार. टीव्ही पाहत राहाणार. टीव्हीवरचा बाँबवर्षाव झेलत राहणार!!

इराण विरुद्ध अमेरिका व इस्राइलचे युद्ध भडकलेले आहे. इराणवर महाशक्ती अमेरिका प्रचंड आक्रमण करते आहे. प्रत्युत्तरादाखल सीमित युद्धसामग्री असताना इराण विविध देशातील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहे.

इराण कडून येणाऱ्या या क्षेपणास्त्रांना आकाशातच निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आखाती देश करत आहेत. या निष्प्रभ क्षेपणास्त्रांचे जळते अवशेष पडल्यामुळे काही इमारतींना आग लागली. या आगीचे दृश्य पुन्हा पुन्हा दाखवून वाहिन्या आपला टीआरपी वाढवत होत्या आणि देशातील परिजनांचे ब्लडप्रेशर विनाकारण वाढत होते.

दोनच दिवसांत विमानसेवेची सुरवात झाली. आम्हाला मुंबईऐवजी हैदराबादचे विमान घ्यावे लागले. खरं तर अजूनही 2-3 दिवस अमिराती सरकारचे पाहुणे म्हणून त्या आलिशान पॅलेसमध्ये सुरक्षित राहता आले असते; पण ‌‘अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसि‌’ या श्रीरामोक्तीची प्रचिती आली. माता आणि मातृभूमीची ओढ काय असते, याचा अनुभव घेत मी मायदेशी परतत होतो.

(श्री. संजय मालपाणी बुधवारी पहाटे सुखरूप संगमनेरला परतले आहेत...)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT