Ashok Kharat Case Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat: ‘समता’ पतसंस्था प्रकरणात 38 खातेदारांचा इन्कार; ईडी चौकशीची शक्यता

अशोक खरातचे संशयास्पद व्यवहार तपासात; इतर बँकांशी संबंध नसल्याचे संस्थांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

नगर: भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेल्या ‌‘समता‌’ पतसंस्थेतील 38 खातेदारांची चौकशी पोलिसांनी केली. त्यात सगळ्याच खातेदारांनी व्यवहाराशी संबंध नसल्याचा जबाब दिला आहे. दरम्यान, संत नागेबाबा, स्वामी विवेकानंद, बुलढाणा अर्बन आणि राहाता पीपल्स बँकेतही खरात नॉमिनी असलेली खाती असल्याचा संशय पोलिसांना होता; मात्र या चारही संस्थांनी ही शक्यता फेटाळत तसे पत्र पोलिसांना दिले आहे.

चार संस्थांनी दिलेली निरंक माहिती पोलिसांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना कळविली असून ईडी या चारही संस्थांची चौकशी कधीही आणि कोणत्याही क्षणी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भोंदू अशोक खरातचे संशयास्पद आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. समता पतसंस्थेतील 100 खात्यांची तपासणी आता अखेरच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत 38 खातेदारांनी समतातील खात्यांचा इन्कार केला आहे. कधीही संस्थेत आलो नाही, खाते, सह्या आमच्या नाहीत, असे जबाब दिले आहेत.

आणखी काही पतसंस्थांशी खरातचे संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यातच खरातच्या आर्थिक व्यवहारांची ईडीकडूनही चौकशी सुरू आहे. खरातचा ताबा घेत ईडी कोणत्याही क्षणी संशयास्पद व्यवहार असलेल्या पतसंस्था, बँकांची चौकशी करू शकते, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. ईडी आणि पोलिस समन्वय सुरू असून आवश्यक त्या माहितीची देवाणघेवाण सुरू असल्याचे समजते.

कल्पना खरातबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर

शिर्डीच्या जमीन व्यवहार प्रकरणात आरोपी असलेली कल्पना अशोक खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होती. यावेळी आरोपीचे वकील हजर होते. मात्र, फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलाने म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे कल्पना खरातच्या जामिनावर आता बुधवारी (दि. 22) सुनावणी होणार आहे.

...तिचीही आता खरातविरुद्ध तक्रार!

भोंदू अशोक खरातच्या सांगण्यावरून नीरज जाधवच्या विरोधात पोलिसात फिर्याद देणाऱ्या तरुणीने काही दिवसांपूर्वी एसआयटीकडे खरात याच्याविरुद्धच तक्रार दिल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीतून खरातचे आणखी काही कारनामे समोर येण्याची शक्यता असून, यातील काही संभाषण देखील एसआयटीच्या हाती लागल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

डोन्ट मीट डीवायएसपी वाकचौरे अगेन...!

शिर्डीत नीरज जाधव विरोधात फिर्याद दाखल आहे. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडून तो तपास सुरू होता. दरम्यान, संशयास्पद फिर्यादीची उलटतपासणी केली जात आहे. त्यात 11 मार्चला फिर्यादीला भोंदू खरातने मोबाईलवरून इंग्रजीत संदेश पाठविल्याचे समोर आले. ‌‘डोन्ट मीट डीवायएसपी वाकचौरे अगेन...‌’ अशी सुरुवात करत ‌‘चौकशीला बोलावले तरी पुन्हा जाऊ नको. त्यांना आपण कायदेशीर धडा शिकवू, काळजी करू नको,‌’ असा त्या संदेशाचा आशय असल्याचे सूत्रांकडून समजले. त्यानंतर फिर्यादी व खरातचे कॉलवर संभाषणही झाल्याची माहिती एसआयटीच्या तपासात समोर आल्याचे समजते. विशेष म्हणजे, त्याच दिवशी अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना राज्य महिला आयोगाची नोटीस आली होती, असे सांगण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT