Rural Wild Fruits Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Rural Wild Fruits Disappearing: रानमेवा आणि ग्रामीण खेळ हरवत चालले; मोबाईलमुळे बदलते बालपण

करवंद, जांभूळ यांसारखी रानफळे आणि पारंपरिक खेळ विस्मृतीत; निसर्गाशी असलेली नाळ तुटत असल्याची चिंता

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर तालुका: ग्रामीण भागात एकेकाळी उन्हाळ्याची सुटी म्हणजे रानमेव्याची पर्वणी मानली जायची. शाळा सुटल्या की मुले-मुली डोंगरदऱ्या, माळराने आणि ओढ्यांच्या काठावर करवंद, जांभूळ, बोर, चिंच, कवठ, बेल, रानआवळा, गोंधण, भोकर यांसारख्या रानफळांच्या शोधात फिरताना दिसत असत. मात्र, आजच्या पिझ्झा, बर्गर आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या जमान्यात नैसर्गिक रानमेवा हळूहळू गायब होत चालला आहे.

गावातील मुलांना करवंदाच्या जाळ्या, जांभळाची झाडे आणि बोराच्या बनांची ठिकाणे अचूक माहिती असत. आज अनेक मुलांना ही फळे प्रत्यक्ष पाहण्याची संधीही मिळत नाही. मोबाईल, इंटरनेट आणि बदलती खाद्यसंस्कृती यामुळे निसर्गाच्या कुशीत मिळणाऱ्या आरोग्यदायी खजिन्याकडे नव्या पिढीचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

रानमेवा केवळ खाण्याचा पदार्थ नव्हता, तर ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. मित्रांसोबत रानात भटकणे, झाडावर चढून फळे तोडणे आणि एकमेकांत वाटून खाणे यामधून निसर्गाशी एक वेगळे नाते निर्माण होत असे. आज त्या जागी फास्ट फूडची दुकाने आणि स्क्रीनसमोरील जीवनशैली दिसत आहे. आजची तरुण पिढी मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेम्समध्ये अधिक रमू लागल्याने ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ व रानमेवा हळूहळू विस्मृतीत जात आहेत. पूर्वी उन्हाळा व पावसाळ्यात मुले-मुली गोट्या, विटीदांडू, लपाछपी, सागरगोटे, चांफुल, लगोरी, पकडा-पकडी, कबड्डी, पोहणे आदींसारखे खेळ खेळत असत. तसेच करवंद, जांभूळ, बोरे, आवळा, चिंच यांसारख्या रानमेव्याचा आस्वाद घेत असत.

रानमेव्यात विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, फास्ट फूड आणि मोबाईलच्या वाढत्या आकर्षणामुळे तरुणाईचा निसर्गाशी असलेला संबंध कमी होत चालला आहे.

वाढती वृक्षतोड, कमी होत जाणारे वनक्षेत्र आणि बदलते हवामान यामुळेही रानफळांची संख्या घटत आहे. रानमेव्याचा वारसा जपण्यासाठी स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धन आणि जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. तसेच पालकांनी मुलांना पारंपरिक खेळ, मैदानी उपक्रम आणि रानमेव्याचे महत्त्व पटवून देण्याची गरज व्यक्त होत आहे. ग्रामीण संस्कृतीचा हा अमूल्य वारसा जपण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे काळाची गरज बनली आहे.

मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या पिढीला जांभळाच्या झाडाखालील बालपण, करवंदांची चव आणि मातीच्या खेळांचा आनंद आता फक्त आठवणीतच उरला आहे. यामुळे बालपणीच मुलांमध्ये विविध आजार जडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कारभारी कर्डिले, ज्येष्ठ नागरिक, मजले चिंचोली
रानमेव्याची गोडी आणि गावच्या खेळांची मैफल हरवत चालली आहे. आधुनिकतेच्या शर्यतीत बालपण निसर्गापासून दूर जात आहे. हातात मोबाईल आला; पण रानमेव्याची ओळख हरवली. तंत्रज्ञान मिळाले मात्र निसर्गाशी असलेली नाळ तुटत चालली आहे.
सनी गायकवाड, वनमित्र, जेऊर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT