टोळी जेरबंद  Pudhari File Photo
अहिल्यानगर

Ahilyanagar : शेंडीत दरोडा घालणारी टोळी जेरबंद

2 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नगर : शेंडी व वांजोळी (ता. नेवासा) येथे शेत वस्तीवर दरोडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जेरबंद केली. त्यांच्याकडून 2 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, चौकशीत आरोपींनी वांजोळी (ता. नेवासा) येथे दरोड्याच्या गुन्ह्याचीही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले (वय 27, रा.पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर), विकी संजय काळे (वय 18, रा.भोरवाडी, ता.अहिल्यानगर), सुशांत सुरेश भोसले (वय 19, रा.पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शेंडी बाह्यवळण रस्त्यावरील अशोक लहानू कजबे, यांच्या वस्तीवर 6 ते 7 दरोडेखोरांनी दरोडा घालून कुटुंबियांना मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून महिलांचे दागिने जबरीने चोरून नेले. याबाबत अशोक कजबे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ व पोलिस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे, हृदय घोडके, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, राहुल सोळुंके, पंकज व्यवहारे, सोमनाथ झांबरे, शाहीद शेख, गणेश धोत्रे यांचे पथक नेमून तपासाकामी रवाना केले. 27 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिस पथकाला माहिती मिळाली, की वरील गुन्हा तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले याने त्याचे साथीदारासह केला असून तो सध्या भोरवाडी येथे घरी आला आहे. त्यानुसार पोलिस पथकाने भोरवाडी (ता. अहिल्यानगर) येथून तुषार भोसले, विकी काळे, सुशांत भोसले यांना पकडले. त्यांच्याकडे विचारपूस केले असता वरील गुन्हा अविनाश उर्फ खुडया सावत्या भोसले (फरार), रमेश उर्फ रम्या सावत्या भोसले (फरार) (दोघे रा.पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर), अभिजीत किरण भोसले (फरार), तपेश किरण भोसले (फरार), वैभव किरण भोसले (फरार) (रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड) यांनी मिळून चार दिवसापूर्वी शेंडी (ता.अहिल्यानगर) येथे दरोडा घातल्याचे सांगितले. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले याने त्याच्या साथीदारासह 10 ते 11 दिवसापूर्वी वांजोळी शिवार (ता.नेवासा, जि.अहिल्यानगर) येथे शेत वस्तीवर दरोडा टाकून चोरी केल्याचे सांगितले.

बुर्‍हाणनगरला विकले चोरीचे सोने

दरोड्याच्या गुन्ह्यातील चोरीचे सोने आरोपी विकी काळे याने बुर्‍हाणनगर येथील त्याच्या ओळखीचा असलेला सोनार विनोद लक्ष्मण बुर्‍हाडे यास विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी बुर्‍हाणनगर येथे जाऊन पंचासमक्ष त्या सोनाराकडून 2 लाख 58 हजारांचे 30 ग्रॅमचे सोने जप्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT