राहुरी: राहुरी शहरासह परिसरामध्ये वाढत्या गुन्हेगारीचे ग्रहण सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. घरफोड्या, दुकानफोड्या या घटना नित्याच्याच ठरत असताना, अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या घटना वाढल्या आहेत.
महिला अत्याचार, विनयभंगासह मारहाणीच्या घटनांनी अक्षरशः कहर केला आहे. शुल्लक कारणावरून अगदी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत हल्ले होत असताना पोलिस प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका संशयास्पद ठरत आहे. (Latest Ahilyanagar News)
मोहरम-आषाढी एकादशीच्या दिवशी मारहाणीची घटना, 23 वर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करून जातीय वाचक शिविगाळ-मारहाणीची घटना, उसणे दिलेले पैस मागितले म्हणून चाकुने हल्ला, बंद घरात चोरी करून, सोन्याचे दागिणे चोरी व रोकड चोरीची घटना या एकाच दिवशी राहुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत, हे बाब विशेष उल्लेखनिय आहे.
दरम्यान, लाख येथील रहिवासी सुनील बापुसाहेब निमसे हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कामकाज पाहतात. प्राथमिक आरोग्य केंद्र उस्थळ दुमाला (ता. नेवासा) येथे कार्यरत असलेले निमसे यांच्या घरी चोरीची घटना घडली.
घरातील डब्ब्यामध्ये ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे मणी, गंठण व 25 हजाराची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार निमसे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. वाघाचा आखाडा येथील अंकित सुरेश धसाळ या तरुणाने काही दिवसांपूर्वी अक्षय विजय तनपुरे (रा. पिंपळाचा मळा, राहुरी) याला 15 हजार रुपये उसणे दिले होते.
धसाळ हा वाघाचा आखाडा येथे कट्ट्यावर मित्रांसमवेत बसलेला असताना, अक्षय तनपुरे आला व अंकित याने अक्षयकडे उसणे दिलेल्या पैशाची मागणी केली. यावर अक्षय तनपुरे याने चावीला लावलेल्या चाकुने वार करीत अंकित याला गनभीर जखमी केले. ‘माझ्या नादाला लागला तर, जीवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली.
तिसर्या घटनेमध्ये 27 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी पप्पू ऊर्फ अतुल बबन गायकवाड व त्याच्या आई विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पप्पू ऊर्फ अतुल याला अटक केली आहे. त्याची आई पसार झाली आहे.दरम्यान, घडलेल्या या घटनांचा तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
सोशल मिडियात अगदी उघडपणे प्रक्षोभक व चिथावणी देणारे संदेश पाठवूनही पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे बिकट चित्र दिसत आहे. परिणामी पोलिस प्रशासनाची दहशत संपुष्टात येऊन, राहुरीत गुन्हेगारांचे प्राबल्य वाढल्याने गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहे.
‘त्या’ घटनांचे गुढ उकलेना!
राहुरीत 10 पेक्षा अधिक मृतदेहांची ओळख पटली नसल्याच्या घटना घडल्या. याबाबत पोलिस प्रशासनाची तपास यंत्रणा ढिम्मच आहे. बारागाव नांदूर हद्दीत एका तरुणाचा निर्घृण खून करुन, मृतदेह टाकून देण्यात आला होता. त्या घटनेबाबत संदिग्धता असताना, राहुरी महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबणा करण्यात आली. त्यावेळी जातीय तणाव निर्माण होऊन, राज्यभर पडसाद उमटून, त्या घटनेबाबत संताप व्यक्त झाला, परंतू विटंबना करणारे ‘ते’ आरोपी पोलिसांच्या रडारवरचं नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांची बघ्याची भूमिका
राहुरी शहरासह परिसरामध्ये अवैध धंदे करणार्यांना छुप्या पद्धतीने पाठबळ लाभत आहे. पोलिस प्रशासन अवैध धंदे उघडपणे सुरू असताना केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टीची दारु विक्री, मुरूम-वाळू तस्करी उघडपणे सुरू असताना एकही कारवाई झालेली दिसत नाही. जुगार अड्डे, सर्वसामान्यांना लुटमारीसह करण्याच्या भर रस्त्यावर घडणार्या भयंकर घटना, शहर व ग्रामीण परिसरात दहशत निर्माण करणार्या टोळ्या सर्रास कार्यरत झाल्या आहेत.
वाक्चौरे यांनी गुन्हेगारांचा तपास लावावा राहुरीतील गुन्हेगारांची दहशत मोडून काढा
राहुरी पोलिस हद्दीमध्ये काही वर्षांपूर्वी गुन्हेगारांची मोठी दहशत होती. त्यावेळी श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाक्चौरे यांनी, मोर्चा हाती घेत गुन्हेगारांना वठणीवर आणले होते. नुकतेच श्रीरामपूर विभागात अप्पर पोलिस अधिक्षकपदी वाक्चौरे यांना पदोन्नती मिळाली आहे. राहुरीत फोफावलेल्या गुन्हेगारीसह रखडलेल्या गुन्ह्यांचा त्यांनी तपास लावावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना लागली आहे.