नगर: जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांची अंतिम प्रभागरचना शुक्रवारी (दि.22) प्रसिद्ध झाली आहे. जनतेच्या मागणीनुसार जवळपास 15 ते 16 गावांची गट आणि गणांत अदलाबदल करुन अंतिम करण्यात आले.
यामध्ये जामखेड तालुक्यांतील गावांची संख्या अधिक आहे. येत्या आठवडाभरात आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. गट व गणांची आरक्षण सोडत झाल्यानंतरच इच्छुकांच्या पूर्वतयारीला वेग येणार आहे. दरम्यान, संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 9 गट व 18 गणांची संख्या आहे.(Latest Ahilyanagar News)
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणुका तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर गट व गणांची प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 22 ऑगस्ट रोजी अंतिम रचना प्रसिध्द केली आहे. प्रारुप रचनेवर उपलब्ध झालेल्या हरकतींपैकी 23 हरकती ग्राह्य धरण्यात येऊन काही गट व गणांत मोजक्याच गावांचा फेरबदल झाला आहे.
अंतिम रचना जिल्हाधिकारी व झेडपी कार्यालयांबरोबरच तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकांवर नागरिकांना बघण्यास उपलब्ध करण्यात आली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण आणि मतदारयादी आदी तीन घटक आवश्यक आहे.
त्यानुसार गट व गणांची रचना पूर्ण झाली आहे. ओबीसी प्रवर्गासाठी 27 टक्के आरक्षण असणार आहे. त्यानुसार येत्या आठ दहा दिवसांत राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा सदस्य होण्यासाठी इच्छुक असणार्या विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे.
2017 मध्ये जिल्हा परिषदेचे 73 गट तर पंचायत समित्यांसाठी 146 गण होते. यंदा शासनाने 2 गट आणि चार गण वाढविले आहेत. त्यामुळे जामखेड व कर्जत या दोन तालुक्यांत प्रत्येकी एक गट आणि दोन गणांची भर पडली आहे.
गटांची अदलाबदल झालेली गावे
प्रारुप रचनेवर 23 हरकती ग्राह्य धरण्यात येऊन जवळपास 15 ते 16 गावांचे गट आणि गण बदलण्यात येऊन अंतिम करण्यात आले. पारनेर तालुक्यातील ढवळपूर गटातील शहाजांपूर सुपा गटात समाविष्ट करण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील डाऊज खुर्द व घारी ही गावे शिंगणापूर गणात होते. ते आता चांदेकसारे गणात समाविष्ट केले.
चांदेकसारे गणातील जेऊर कुंभारीचा शिंगणापूर गणात समावेश झाला. श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रूक येळपणे गटात घेतले. लिंपणगाव गणातील बाबुर्डी हंगेवाडी गणात घेण्यात आले.जामखेड तालुक्यातील खांडवी हे गाव जवळा गटातून आता साकत गटात समाविष्ट झाले. तेलंगशी गाव साकत गटातून आता खर्डा गटात घेतले आहे.
डिसलेवाडी जवळा गटात होते. ते आता साकत गटात आले. साकत गटातील जायभायवाडी आता खर्डा गटात आले. धामणगाव साकत गटात होते. ते खर्डा गटात समाविष्ट झाले आहे. खर्डा गटातील राजेवाडी साकत गटात गेले आहे. खर्डा गटातील नान्नज गाव आता जवळा गटात टाकले आहे. कुसडगाव जवळा गटात होते. ते आता साकत गटात समाविष्ट झाले आहे. जवळा गटातील सरदवाडी आता साकत गटात तर साकत गटातील बांधखडक गाव आता खर्डा गटात समाविष्ट झाले आहे.
गट आणि कंसात गणांची संख्या
अकोले : 6 (12), संगमनेर : 9 (18), कोपरगाव : 5 (10),
राहाता : 5 (10), श्रीरामपूर : 4 (8), नेवासा : 7 (14),
शेवगाव : 4 (8), पाथर्डी : 5 (10), नगर : 6 (12),
राहुरी : 5 (10), पारनेर : 5(10), श्रीगोंदा : 6 (12),
कर्जत : 5 (10), जामखेड : 3 (6).