कर्जत: तालुक्यातील राशीन येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकामध्ये झेंडा लावण्यावरून निर्माण झालेला वादावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (दि. 13) प्रांताधिकारी कार्यालयात शांतता कमिटीची पुन्हा एकदा प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
मात्र, या बैठकीत या वादावर तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश आले. अखेर प्रांताधिकार्यांनी दोन्ही गटांना 15 ऑगस्टपर्यंत आपल्या स्तरावर समन्वयाने योग्य निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम दिला आहे. (Latest Ahilyanagar News)
राशीन येथे महात्मा फुले चौकात निर्माण झालेला वाद मिटण्याऐवजी सातत्याने चिघळत आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने शांतता कमिटीची कर्जतमध्ये घेतलेली ही तिसरी बैठक आहे. या बैठकीपूर्वी दि. 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकार्यांची बैठक झाली.
या बैठकीत शिंदे यांनी दोन्हीही गटांना 15 तारखेपर्यंत आपण याबाबत समन्वयाने योग्य तो निर्णय घ्यावा, समन्वयाने तोडगा निघाला नाही, तर, प्रशासन स्वतः याबाबत पुढाकार घेऊन निर्णय करेल आणि तो सर्वांना बंधनकारक राहील, असा इशारा दिला.बुधवारी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी पुन्हा सर्व घडामोडींचा आढावा घेतला. यावेळी दोन्ही गटांच्या उपस्थितांनी आपली भूमिका मांडली.
दोन्हीही गट आपल्या भूमिकांवर ठाम राहिल्यामुळे यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. प्रांताधिकारी पाटील यांनी दोन्ही गटांना राशीन येथे सर्वांची एकत्रित बैठक घेऊन समन्वयाने योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. मात्र, समन्वयाने बैठक होऊ शकत नाही असे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे, तहसीलदार गुरू बिराजदार, पोलिस निरीक्षक संपतराव शिरसाठ, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे सौताडे, ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी रूपचंद जगताप उपस्थित होते.