नगर : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणार्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये जानेवारी 2025 मध्ये अहिल्यानगर महानगरपालिका प्रभावी कामगिरीच्या जोरावर झेप घेत यंदा दहावा क्रमांक मिळवला आहे. गतवर्षी अहिल्यानगर 27 व्या नंबरवर होते. राज्यातील 27 महानगरपालिकांमध्ये स्थान मिळवताना महापालिकेने विविध आरोग्य उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.
महानगरपालिकेचा बेस्ट स्कोटर 100 पैकी 34.92 असून, राज्यात 10 व्या क्रमांकावर पोहोचण्याचा मान आरोग्य विभागाने मिळवला आहे. महानगरपालिकेच्या योजनांचा सकारात्मक प्रभाव दिसून आला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जानेवारी महिन्यात विविध प्रभावी मोहिमा राबवून पुढील विविध विषयामध्ये उल्लेखनीय गुण मिळविले. आगामी काळात या मोहिमेवर विशेष नियोजन करून अधिक प्रभावी आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
आयुक्त यशवंत डांगे यांनी 11 जुलै 2024 रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जुलै महिन्यात आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देऊन कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. तथापि, एप्रिल ते डिसेंबर 2024 पर्यंत अपेक्षित सुधारणा न दिसल्याने 17 जानेवारी रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून जानेवारी 2025 च्या रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या.
एप्रिल ते डिसेंबर 2024 कालावधीत महानगरपालिकेचा राज्य रँकिंगमध्ये सातत्याने नीचांक होता. मात्र, जानेवारी 2025 मध्ये 10 वा क्रमांक मिळवण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठण्यात आला आहे. आगामी काळात, राज्यात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्याचा महानगरपालिकेचा निर्धार आहे. महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी वचनबद्ध असून, भविष्यात अधिक चांगल्या कामगिरीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल.यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक