रोहित पवार आणि राम शिंदे  pudhari
अहिल्यानगर

राम शिंदे सभापतीपदाचे अवमूल्यन करीत आहेत; आमदार रोहित पवार यांची टीका

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : कर्जत नगरपंचायतमधील राजकीय उलथपालथीनंतर आता हा संघर्ष आमदार रोहित पवार आणि सभापती राम शिंदे यांच्यात सुरू झाला असल्याचे दिसत आहे. विधानपरिषदेचे सभापती यांनी तर विधिमंडळातील दालनात नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं. राम शिंदे सभापतीपदाचा अवमूल्यन करीत आहेत, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

कर्जत नगरपंचायतीच्या राजकीय परिस्थितीवरुन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. त्यावर आमदार पवार यांनी पलटवार केला आहे. आमदार पवार यांनी टीका करताना थेट सभापतीपद आणि त्याचे घटनात्मक पद हे सांगितले आहे.

ते म्हणाले की, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती ही घटनात्मक पदे असून महाराष्ट्रात या पदांवरील व्यक्तींना विशेष मानसन्मान आहे. या पदांवरील आजवरच्या सर्वांनीच स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा मानसन्मान वाढवला. पण अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय, अशी शंका येते.

आमदार पवार पुढे म्हणाले की, विधानपरिषदेचे सभापती यांनी तर विधिमंडळातील दालनात कर्जत नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं. वास्तविक प्रथा परंपरा, निष्ठा, विचार यांची बरोबरी पैशात कधीही होऊ शकत नाही, त्यामुळं कर्जत जामखेडने पैशांपेक्षा प्रथा, परंपरा, निष्ठा आणि विचार कायमच जपला. पण आज काय परिस्थिती आहे. असा सवाल आमदार पवार यांनी उपस्थित केला.

एक मात्र बरं झालं, यानिमित्ताने फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे हे उघड झाले. आता अपेक्षा एकच आहे, त्यांनी राजकारण जरूर करावं पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची आणि कर्जत -जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील आमदार पवार यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT